
सर्वसामान्यांच्या रक्षणाची शपथ घेणाऱ्या पोलिसांनीच पैशांसाठी माणुसकी आणि खाकी वर्दीची प्रतिष्ठा पायदळी तुडवल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी आणि मदत करण्याच्या नावाखाली चक्क तीन लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. ही लाच मागणाऱ्या खडकपाडा पोलीस स्टेशनमधील सहायक पोलीस निरीक्षकासह त्यांच्या एका साथीदार हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.
कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्यात आधारवाडी परिसरातील विनीत गायकर या तरुणाविरोधात नुकताच एका २९ वर्षीय तरुणीवर बलात्कार आणि मोबाईल हॅक करून धमकावल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला होता. विनीत गायकर याने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केले. तसेच अश्लील व्हिडीओचा वापर करत तरुणीला धमकावल्याचेही तपासात उघड झाले होते.
या गुन्ह्याचा तपास करत असलेले खडकपाडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक (PSI) तुकाराम गंगाराम जोशी (वय ५७) यांनी आरोपी विनीत गायकर याच्या वडिलांशी संपर्क साधला. आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी आणि गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी PSI जोशी यांनी त्यांच्याकडे थेट ३ लाख रुपये लाच द्या, अशी मागणी केली. यानंतर तडजोडीनंतर ही रक्कम २ लाख रुपये इतकी निश्चित झाली.
पोलिसांच्या या अजब कारनाम्याने हादरलेल्या आरोपीच्या वडिलांनी थेट ठाण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची सत्यता पडताळली. या पडताळणीमध्ये PSI जोशी यांनी लाचेची मागणी करण्यासाठी महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमधील पोलीस शिपाई विजय वामन काळे (वय ३८) याच्यामार्फत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार, २० ऑक्टोबर रोजी कल्याणमधील डॉन बॉस्को शाळेसमोरील रोड परिसरात ACB ने सापळा रचला. या सापळ्यात १ लाख २५ हजार रुपये लाच घेताना हवालदार विजय काळे याला आणि त्यानंतर PSI तुकाराम जोशी यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सध्या या दोघांविरोधात खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष नावलगी करत आहेत. या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.