
दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा. या काळात अभ्यासासोबतच वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचे मोठे आव्हान विद्यार्थी आणि पालकांसमोर असते. कल्याण-डोंबिवली सारख्या गजबजलेल्या शहरात मेट्रोची कामे, उड्डाणपुलांचे बांधकाम आणि रस्त्यांचे काँक्रीटीकरण यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. हीच अडचण ओळखून कल्याण वाहतूक पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एक अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण वाहतूक विभागाने विशेष पथके तैनात केली आहेत. शहरात ठिकठिकाणी १२ विशेष बाईक रायडर्स तैनात करण्यात आले आहेत. जर एखादा विद्यार्थी वाहतूक कोंडीत अडकला, तर हे रायडर्स त्याला तातडीने मदत करून सुरक्षितपणे आणि वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचवतील. “वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांचा मानसिक ताण वाढू नये आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, हाच आमचा प्रामाणिक उद्देश आहे,” अशी भावना कल्याण वाहतूक शाखेचे एसपी किरण बालवडकर यांनी व्यक्त केली आहे.
जे विद्यार्थी किंवा पालकांनी वाहतूक कोंडीत अडकल्यास खालील क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधावा. फोन केल्यानंतर काही वेळातच जवळचा ट्रॅफिक रायडर मदतीला पोहोचेल. पोलिसांच्या या तत्परतेमुळे विद्यार्थी आणि पालकांवरील परीक्षेचा ताण हलका होण्यास मोठी मदत होणार आहे.
केवळ बाईक रायडर्सच नाही, तर परीक्षा केंद्रांच्या परिसरातील अनधिकृत पार्किंग आणि अडथळे दूर करण्यावरही पोलिसांनी भर दिला आहे. पोलिसांनी पालकांना विनंती केली आहे की, परीक्षेच्या काळात किमान अर्धा तास आधी घरातून निघावे आणि मुख्य रस्त्यांवरील गर्दी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा. खाकी वर्दीतील या संवेदनशील भूमिकेमुळे कल्याणकरांमध्ये पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन घडत असून, पालकांवरील परीक्षेचा ताण हलका होण्यास मोठी मदत होत आहे.