सरन्यायाधीशांची मातोश्री संघाच्या मंचावर जाणार?, मुलानेच थेट सांगितलं; आंबेडकरी जनतेचं निर्णयाकडे लक्ष

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावतीतील कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला होता, कारण सरन्यायाधीशांच्या मातोश्री डॉ. कमलताई गवई उपस्थित राहणार की नाही, याबाबत संभ्रम होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पत्राने हा वाद वाढवला. मात्र, आता त्यांचे पुत्र राजेंद्र गवई यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

सरन्यायाधीशांची मातोश्री संघाच्या मंचावर जाणार?, मुलानेच थेट सांगितलं; आंबेडकरी जनतेचं निर्णयाकडे लक्ष
सरन्यायाधीशांची मातोश्री संघाच्या मंचावर जाणार?
| Updated on: Sep 29, 2025 | 11:56 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष असून त्यानिमित्त येत्या पाच ऑक्टोबरला एका विशेष कार्यक्रमाचे अमरावतीमध्ये आयोजन करण्यात आले आहे. मात्र हाच कार्यमक्रम सध्या बराच चर्चेत आहे, त्यामागचं कारण म्हणजे संघाच्या या विजया दशमीच्या कार्यक्रमावरून रंगलेली चर्चा. या कार्यक्रमाला मुख्य अतिथि म्हणून दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा आणि देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री डॉ. कमलताई गवई या उपस्थित राहणार असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यांनी हे निमंत्रण स्वीकारल्याची माहितीही उघड झाली होती. मात्र आता कमलाताई गवई यांच्या नावाने सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झालं असून त्या संघाच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे सांगत काही आरोपही करण्यात आले आहेत.

याच मुद्यावरून आता सरन्यायाधीशांची मातोश्री संघाच्या मंचावर जाणार की नाही अशी चर्चा सुरू झाली असून कमलाताई गवई यांच्या मुलानेच आता या विषयावर थेट स्पष्टीकरण दिलं आहे. राजेंद्र गवई कमलताई गवई यांचे पुत्र असून त्यांनी हा कार्यक्रम आणि त्याला कमलाताई यांची उपस्थिती या विषयावर मौन सोडलं आहे.

काय म्हणाले राजेंद्र गवई ?

येत्या पाच तारखेला अमरावतीमध्ये संघाचा कार्यक्रम होत आहे. आईसाहेबांना (कमलाताई गवई) त्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं असून, त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलं आहे असं त्यांचा मुलगा राजेंद्र गवई यांनी स्पष्ट सांगितलं. संघाच्या मुख्य कार्यक्रमांसाठी यापूर्वी नागपूरमध्ये आदरणीय दिवंगत रिपब्लिकन पक्षाचे नेते राजाभाऊ खोब्रागडे आणि दिवंगत दादासाहेब गवई हे देखील गेले होते. गवई परिवाराचे पक्षविरहित संबंध आहे. इंदिरा गांधींसोबत दादासाहेब गवईंचे अतिशय जवळचे संबंध होते.तर विदर्भातील नेते गंगाधर फडणवीस यांच्यासोबत देखील दादासाहेबांचे संबंध होते. त्यांचे संबंध भावा भावांचे होते, परंतु विचारधारा ही वेगवेगळी होती. कार्यक्रमाला गेल म्हणजे विचारधारा बदलेल असं मुळीच नाही, असं राजेंद्र गवई यांनी ठामपणे सांगितलं.

विरोधकांच्या पोटात दुखतंय

त्या कार्यक्रमात गेलं पाहिजे अशा मताचा मी आहे. आमची मैत्री राहील, परंतु आमची विचारधारा ही पक्की आहे. गवई साहेबांच्या विरोधकांच्या पोटात दुखत आहे, त्यामुळे ,सोशल मीडियावर उलट सुलट टीका केली जात आहे, असा आरोप गवई यांनी केला. भूषणजी गवई मोठ्या पदावर गेल्यामुळे विरोधक मुद्दामून टीका टिपणी करत आहेत. काही सकारात्मक देखील टिपण्णी होत आहे पण मी त्याच्याकडे फार लक्ष देत नाही. आईसाहेबांनी निर्णय घेतलेला आहे, एक मुलगा म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे मी निश्चितच सांगेन. आम्ही सर्वधर्मसमभावाला मानणारे आहोत, सर्वधर्म समभावाच्या पक्षासोबत काल होतो, आजही आहोत आणि आणि उद्याही राहू, असंही राजेंद्र गवई यांनी नमूद केलं.

काय आहे प्रकरण ?

येत्या 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजया दशमी उत्सव नागपूरमध्ये होणार असून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे असतील. तर 5 ऑक्टोबर रोजी अमरावतीमध्ये होणाऱ्या संघाच्या कार्यक्रमाला कमलाताई गवई या मुख्य अतिथि म्हणून उपस्थित राहणार असल्याच्या निमंत्रण पत्रिकाचे वाटप झाले. मात्र काल कमलताई यांचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले, त्यामध्ये आपण संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे नमूद करण्यात आले, त्यामुळे वाद उद्भवला होता.

मात्र आता कमलाताई यांचे पुत्र राजेंद्र यांनीच या संपूर्ण विषयावर स्पष्टीकरण दिले आहे.