‘गोपाळकाला गोड झाला…’ विठ्ठल नामाचा जयघोष अन् गुलालाची उधळण; पंढरपुरात कार्तिकी वारीची भक्तिमय सांगता!

Gulal Showered as Kartiki Wari Comes to an End in Pandharpur: पंढरपुरात महाद्वारकाल्याने कार्तिकी वारीची सांगता झाली आहे. विठ्ठल नामाचा जयघोष अन् गुलाल-बुक्क्याची मुक्त उधळण करण्यात आली आहे.

गोपाळकाला गोड झाला... विठ्ठल नामाचा जयघोष अन् गुलालाची उधळण; पंढरपुरात कार्तिकी वारीची भक्तिमय सांगता!
Pandharpur Marks the Grand Finale of Kartiki Wari
| Updated on: Nov 25, 2026 | 6:57 PM

पंढरपूरमध्ये भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. ‘गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला…’ या जयघोषाने अवघे मंदिर परिसर दुमदुमून गेले. टाळ-मृदंगाचा गजर, विठ्ठल नामाचा अखंड जयघोष आणि गुलाल-बुक्क्याची मुक्त उधळण अशा भक्तिमय वातावरणात कार्तिकी यात्रेची सांगता झाली. शेकडो वर्षांची परंपरा असलेला महाद्वारकाला सोहळा आज श्री विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला.

या सोहळ्यासाठी मंदिर परिसरात वारकरी आणि भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कार्तिकी यात्रेच्या सांगतेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक महाद्वारकाला सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जाते. या सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपुरात विठ्ठल भक्तीचा अनोखा सोहळा अनुभवायला मिळाला.

Loading...

परंपरेनुसार, हरिदासांच्या काल्याच्या वाड्यातून मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर पागोट्याच्या साहाय्याने श्री पांडुरंगाच्या पादुका बांधण्यात आल्या. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात या पादुका मंदिराकडे नेण्यात आल्या. संत नामदेव पायरीमार्गे या पादुका श्री विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात आणण्यात आल्या. यावेळी वारकरी आणि भाविकांनी विठ्ठल नामाचा गजर करत भक्तिभावाने या सोहळ्यात सहभाग घेतला.

पादुका मंदिराच्या सभामंडपात आणल्यानंतर महाद्वारकाला सोहळ्यातील महत्त्वाचा विधी पार पडला. यावेळी मानाची दहीहंडी फोडण्यात आली. त्यानंतर गोपाळकाल्याचा प्रसाद उपस्थित वारकरी आणि भाविकांना वाटप करण्यात आला. ‘गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला’ असा जयघोष करत वारकऱ्यांनी या सोहळ्याचा आनंद साजरा केला. दहीहंडी फुटताच मंदिर परिसरात गुलाल आणि बुक्क्याची मुक्त उधळण करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरंगात न्हाऊन निघाला.

महाद्वारकाला हा केवळ धार्मिक विधी नसून पंढरपूरच्या वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाची परंपरा मानली जाते. कार्तिकी यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांसाठी हा सोहळा विशेष आकर्षणाचा असतो. विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत, नामस्मरण आणि काल्याचा प्रसाद घेत वारकरी या यात्रेची सांगता करतात. यंदाही भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने पार पडलेल्या महाद्वारकाला सोहळ्याने कार्तिकी वारीची पारंपरिक पद्धतीने सांगता झाली. विठ्ठल नामाच्या गजराने पंढरी नगरी पुन्हा एकदा भक्तिरसात चिंब झाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us