करुणा मुंडेंकडून बड्या नेत्यांच्या भेटीगाठी, घडामोडींना वेग, पक्षप्रवेशाचं काय ठरलं? पहिली प्रतिक्रिया समोर
करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बड्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू असून आता काँग्रेस प्रवेशाबाबत त्यांनी मोठा खुलासा केला आहे, त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. करुणा मुंडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात माझी भेट झाली, असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यापूर्वी करुणा मुंडे यांची काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याशी देखील चर्चा झाली आहे. भाजपमध्ये मुंडे आहेत, तर मग काँग्रेसमध्ये देखील मुंडे पाहिजे, असं वडेट्टीवार आपल्याला म्हटल्याची माहिती यावेळी करुणा मुंडे यांनी दिली आहे. या सर्व भेटीगाठींवर आता करुणा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाल्या मुंडे?
काँग्रेस पक्षाकडून मला काही जबाबदाऱ्या आणि पदाचे पर्याय सुचवण्यात आले आहेत. परंतु मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील अशी इच्छा व्यक्त केली होती, की भाजपमध्ये मुंडे आहेत, तर मग काँग्रेसमध्ये देखील मुंडे पाहिजे. तसेच माझ्या कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे की, मी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा. त्यांनी मला सांगितलं की मी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा.या सर्व पार्श्वभूमीवर मी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. माझं वडेट्टीवार यांच्याशी देखील बोलणं झालं आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी करुणा मुंडे यांनी दिली आहे.
कोण आहेत करुणा मुंडे?
करुणा मुंडे यांचं पूर्वीच नाव करुणा शर्मा असं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आपण पहिल्या पत्नी असल्याचा दावा करुणा मुंडेंकडून करण्यात आला आहे. हे प्रकरण सध्या कोर्टात आहे, करुणा मुंडे यांच्याकडून आपल्या या दाव्यासंदर्भातील काही कागदपत्रं देखील कोर्टात सादर करण्यात आले आहेत. दरम्यान करुणा मुंडे यांनी अनेकवेळा विविध प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचं पहायला मिळालं आहे. त्यानंतर आता त्या मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहेत, त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही कोणताही निर्णय झाला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.