…म्हणून वाल्मिकच्या एन्काउंटरची सुपारी दिली असेल, करुणा शर्मांचा खळबळजनक आरोप

वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर आपल्याला  देण्यात आली होती, असा दावा निलंबित पोलीस अधिकारी  रंजित कासले यांनी केला आहे, यावर आता करुणा शर्मा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

...म्हणून वाल्मिकच्या एन्काउंटरची सुपारी दिली असेल, करुणा शर्मांचा खळबळजनक आरोप
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 14, 2025 | 4:51 PM

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलं आहे, सध्या ते कारागृहात आहेत. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. निलंबित पोलीस अधिकाऱ्यानं मोठा दावा केला आहे. या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराड याच्या   एन्काऊंटरची ऑफर आपल्याला  देण्यात आली होती, असा दावा निलंबित पोलीस अधिकारी  रंजित कासले यांनी केला आहे. रंजित कासले यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान आता रंजित कासले यांच्या या दाव्यावर करुणा शर्मा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमंक काय म्हणाल्या करुणा शर्मा?  

वाल्मिकच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबतचा दावा खरा असू शकतो.  आज किती जरी काही केलं तरी ते पोलीस अधिकारी आहेत, ते खरं बोलत असणार. त्यांना वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी दिली असेल. कारण धनंजय मुंडेंचे सगळे काळे कारनामे वाल्मिक कराडकडे आहेत, त्यामुळे होऊ शकतं.  पाच कोटी ही खूप छोटी रक्कम आहे. या लोकांकडे प्रचंड पैसा आहे. आज तुम्ही बघा एका मंत्र्याचं बजेट 45 -45 हजार कोटींच असतं. त्यामुळे पाच कोटी ही फार थोडी रक्कम आहे, ते शंभर कोटी रुपये देखील देऊ शकतात.

इथे सगळं राजकारण पैशांच्या जोरावरच चालू आहे. आज तुम्ही बघू शकता मोठ-मोठे कांड लोकांच्या समोर आलेले आहेत. वाल्मिक कराड तर एक मोहरा आहे. अंजलीताई दमानिया तर दररोज नव-नवे खुलासे करत आहेत, मात्र अनेक प्रकरणं पैशांच्या जोरावर दाबले जात आहेत, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे.

दरम्यान तुम्ही मागणी केली आहे की, रणजित कासले यांना पुन्हा एकदा कामावर घ्यावं, मात्र त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, असा प्रश्नही यावेळी करुणा शर्मा यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की,  जर पोलीस अधिकाऱ्यांची ही अवस्था आहे तर सामान्य लोकांची काय अवस्था असेल. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही गृहमंत्रालयानं घेतली पाहिजे, असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.