Kolhapur Flood : ‘अलमट्टी विसर्गाबाबत पाठपुरावा करा, आताच अधिकच्या विसर्गासाठी प्रयत्न गरजेचा’, फडणवीसांचा राज्य सरकारला सल्ला

| Updated on: Jul 24, 2021 | 2:20 PM

कोल्हापूर, सांगली भागात पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठीसुध्या राज्य सरकारनं तातडीनं पाऊलं उचलण्याची गरज असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

Kolhapur Flood : अलमट्टी विसर्गाबाबत पाठपुरावा करा, आताच अधिकच्या विसर्गासाठी प्रयत्न गरजेचा, फडणवीसांचा राज्य सरकारला सल्ला
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us on

मुंबई : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नदीच्या परिसरात गेल्या 8 दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे या नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. पुराचं पाणी पुणे-बंगळुरु हायवेवर आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे हायवेवर तब्बल 20 किलोमीटरची रांग लागल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी कोल्हापूर, सांगली भागात पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठीसुध्या राज्य सरकारनं तातडीनं पाऊलं उचलण्याची गरज असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारशी सतत पाठपुरावा करुन समन्वय स्थापित केला पाहिजे असा सल्लाही फडणवीसांनी सरकारला दिलाय. (Devendra Fadnavis advises Thackeray government about discharge from Almatti dam)

‘कोल्हापूर, सांगली भागात पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुद्धा राज्य सरकारने तातडीने पाऊले टाकण्याची गरज आहे. अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारशी सतत पाठपुरावा करून समन्वय स्थापित केला पाहिजे. कर्नाटकच्या काही भागात पूर परिस्थिती निर्माण होत असल्याने नंतर हा विसर्ग योग्य दाबाने होण्यात अडचणी निर्माण होतात आणि कोल्हापूर व सांगलीच्या भागात पाणी पातळी वाढत जाते. त्यामुळे आताच अधिकचा विसर्ग कसा करता येईल, याचा प्रयत्न करावा’, असं ट्वीट करुन फडणवीसांनी ठाकरे सरकारला महत्वाचा सल्ला दिलाय.

पूर आणि दरडग्रस्तांना तातडीने रोख मदत करा

कोकण, पश्चिम महाराष्ट्र विशेषत: महाडनजिक घडलेल्या घटना पाहता तातडीची मदत करण्यात यावी. तसेच नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत द्यायला हवी. पिण्याचे पाणी, अन्न, कोरोनाचा कालखंड पाहता आरोग्य सुविधा या बाबी प्राधान्यक्रमात असल्याच पाहिजेत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘रिस्क असेसमेंट‘ तयार करा

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागात सातत्याने येणारी संकटं पाहता थोडा दूरगामी विचार सुद्धा राज्य सरकारने करण्याची गरज आहे. तळिये या गावात घरे नव्याने पण सुरक्षित ठिकाणी बांधून सर्व नागरी सुविधा नागरिकांना निर्माण करून द्याव्यात. असे करताना धोकादायक क्षेत्राबाहेर हे पुनर्वसन असावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. इतर धोकादायक गावे तत्काळ ओळखून, त्यासाठीचे सर्वेक्षण तातडीने करण्यात यावे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये ‘रिस्क असेसमेंट‘ तातडीने करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी फडणवीसांनी केली.

कोकणासाठी स्वतंत्रं आपत्ती व्यवस्थापन असावं

कोकणची भौगोलिक स्थिती आणि सातत्याने येणारी संकटं पाहता कोकणासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करण्यात यावी. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

संबंधित बातम्या : 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने महाडमध्ये, आता रस्तेमार्गे तळीयेच्या दिशेने

Hirkaniwadi landslide : रायगडमध्ये दुर्घटनांची मालिका सुरुच, आता हिरकणीवाडीत दरड कोसळली

Devendra Fadnavis advises Thackeray government about discharge from Almatti dam