जेलमध्ये गेलेल्या मविआ नेत्यांची स्तुती, हसन मुश्रीफांना डिवचलं, शरद पवार यांनी भाषणात कुणालाच सोडलं नाही

शरद पवार यांनी आजच्या कोल्हापूरच्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी आपल्या भाषणात एकही मुद्दा सोडला नाही. त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. याशिवाय त्यांनी आपल्याच पक्षाच्या काही नेत्यांना चांगलेच टोले लगावले.

जेलमध्ये गेलेल्या मविआ नेत्यांची स्तुती, हसन मुश्रीफांना डिवचलं, शरद पवार यांनी भाषणात कुणालाच सोडलं नाही
| Updated on: Aug 25, 2023 | 9:02 PM

कोल्हापूर | 25 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापुरात जाहीर सभा पार पडली. या सभेत शरद पवार यांनी धडाकेबाज भाषण केलं. शरद पवार यांनी आपल्या भाषणात भाजपवर सडकून टीका केली. भाजपकडून ईडीचा उपयोग करुन विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्यात आला. ईडीच्या कारवाईने आपल्यासोबत काम केलेले काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी संघर्ष न करता भाजप सांगेल तिथे बसण्याचा मार्ग स्वीकारला. विशेष म्हणजे आमची एक बघिणी आमच्यावर गोळ्या घाला म्हणाली, पण त्या घराच्या कुटुंबप्रमुखाला ते जमलं नाही, असं म्हणत शरद पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

“आताच आपण बघितलं की, महाराष्ट्रात ईडीच्या नोटीसचा दम काही नेत्यांना दिला. काही लोकांनी तोंड दिलं. पण काही लोकांनी भूमिका बदलली. कोल्हापूर हे शूरांचं गाव आहे. ही नदी आणि या जिल्ह्याचा इतिहास हा शौर्याचा आहे. त्यामुळे इथे ईडीची अशी नोटीस आली तर सामोरं जायची हिंमत दाखवली जाईल, अशी माझी कल्पना होती. पण इथे काहीतरी वेगळंच घडलं”, असं शरद पवार म्हणाले.

“कोल्हापुरात कुणालातरी नोटीस आली. कुणाच्या तरी घरी सीबीआयचे लोकं गेली. कुणाच्या घरी इनकम टॅक्सचे लोक गेले. एकेकाळी आमच्याबरोबर काम केलेले लोकं काहीतरी स्वाभिमान असेल, घरातल्या महिलांनी सांगितलं, ज्याप्रकारे तुम्ही आमच्यावर आरोपांचे हल्ले करता, धाड घालत आहात, यापेक्षा तुम्ही आम्हाला गोळ्या घाला, असं एक बघिणी म्हणू शकते. पण कुटुंबप्रमुखाने असं काही म्हटलेलं मी ऐकलं नाही. ज्या बघिणीने धाडस दाखवलं ते धाडस दाखवण्याऐवजी भाजपसोबत जावू, ते म्हणतील तिथे बसू आणि यातून आपली सुटका करुन घेऊ, अशी भूमिका घेतली”, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांनी अनिल देशमुखांचा ‘तो’ प्रसंग सांगितला

“सत्तेचा वापर केवळ विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी केला जातोय. अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. ते स्पष्ट भूमिका घेत होते. त्यांना आवर घालायचं म्हणून त्यांच्यावर खोटा खटला भरला. बारा-तेरा महिने राज्याचा गृहमंत्री तुरुंगात जातो, हा गृहमंत्री स्वाभिमानी माणूस होता. त्यांना सांगण्यात आलं की, तुम्ही आमच्याकडे या, आमच्या गटात, पक्षात या, जर आला नाहीत तर तुमची जागा आत राहील”, असं शरद पवार यांनी सांगितलं.

“अनिल देशमुख यांनी स्पष्ट सांगितलं की, माझी जागा तुरुंगात असो किंवा बाहेर असो मी सत्य तेच बोलणार. ही गत सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यासोबत केली. ते लिहितात, टीका करतात, त्यांनाही तुरुंगात टाकलं. त्यांना एकच सांगितलं की तुम्ही हे बंद करा. त्यानी सांगितलं की, माझं लिखाण सत्य आहे. ते मी बंद करणार नाही. त्यांनाही तुरुंगात टाकलं. नवाब मलिक केंद्र सरकारच्या चुकीच्या गोष्टींवर टीका करत होते, त्यांनाही जेलमध्ये टाकलं. त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर झालाय”, असं शरद पवार म्हणाले.

‘मला ईडीने नोटीस पाठवली तेव्हा…’

“प्रामाणिकपणाने समाजिक कार्य करणाऱ्यांबरोबर अशाप्रकारच्या गोष्टी केल्या जातात. त्याचा परिणाम त्यांना असं वाटतं की, आम्ही त्यांना घाबरून जातो. एकदा निवडणुकीच्या आधी मला ईडीची नोटीस आली. त्यांनी सांगितलं की, ईडीच्या ऑफिसमध्ये तुम्ही या. मी त्यांना सांगितलं की, तुम्ही उद्या या म्हणता, मी आता येतो”, असं पवार म्हणाले.

“मी येतो हे जाहीर केल्यानंतर पोलीस आयुक्त, ईडी अधिकारी घरी आले. तुम्हाला हात जोडतो, पण तुम्ही ईडी कार्यालयात येऊ नका, अशी विनंती केली. मला ज्या कामासाठी ईडीची नोटीस दिली ती एका बँकेच्या व्यवहाराविषयी होती. त्या बँकेचा मी सभासद नव्हतो. त्या बँकेत माझं खातंही नव्हतं. त्या बँकेचं मी कधी कर्ज घेतलं नव्हतं किंवा माझी कोणतीही ठेव नव्हती”, असं पवार म्हणाले.

“काही नसताना भीती घालायची म्हणून ईडीची नोटीस पाठवली. मी येतो म्हटल्यावर तेव्हा कुणीही तयारी ठेवली नाही. तसं धाडस लोकांनीदेखील दाखवलं पाहिजे. आपली बाजू सत्याची असेल तर त्याला चिंता करायचं कारण नाही. देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत घाबरले नाहीत”, असं शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले.