विधान परिषदेच्या बदल्यात पालकमंत्रीपदासाठी तडजोड झाली का?; आमदार दळवींचा गोगावलेंना थेट सवाल

आमदार महेंद्र दळवींनी मंत्री भरत गोगावलेंना थेट विचारले, विधान परिषद निवडणुकीत पालकमंत्रीपदासाठी तडजोड झाली का? दळवींनी 'व्यक्तीस्वार्थ' आणि 'काही सुपुत्रां'वरही अप्रत्यक्ष टीका केली. कोकणच्या राजकारणात पक्षांतर्गत खदखद असल्याचे त्यांनी दाखवून दिले.

विधान परिषदेच्या बदल्यात पालकमंत्रीपदासाठी तडजोड झाली का?; आमदार दळवींचा गोगावलेंना थेट सवाल
भरत गोगावले यांना सवाल
| Updated on: Jun 04, 2026 | 12:25 PM

कोकण विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा मंत्री भरत गोगावले आणि त्यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या चर्चांचा संदर्भ देत विधान परिषद उमेदवारीच्या बदल्यात पालकमंत्रीपदासाठी काही तडजोड झाली का? अशी चर्चा सुरू असल्याचे दळवी यांनी म्हटले. अशा प्रकारच्या चर्चा अपमानजनक असल्याचे सांगत, थेट वाटपामध्ये जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली असली तरी गिव्ह अँड टेकमध्ये काही गोष्टी ठरत असतात, मात्र त्यामध्ये काही लोकांचा व्यक्तीस्वार्थ स्पष्टपणे दिसत होता, असे वक्तव्य महेंद्र दळवी यांनी केले आहे.

महेंद्र दळवी मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत काही निर्णयांमागे वैयक्तिक स्वार्थ असल्याचा सूचक आरोप केला. तसेच “काही सुपुत्र वेगळ्याच पद्धतीने बोलतात. राजकीय परिपक्वता असायला हवी. स्वार्थासाठी इमान गहाण ठेवून बोलणे शोभनीय नाही,” अशा शब्दांत महेंद्र दळवी यांनी विकास गोगावले यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. प्रत्येकाने बोलताना राजकीय मर्यादा आणि सभ्यता जपली पाहिजे, असेही दळवी यांनी स्पष्ट केले.

नाराजी आणि खदखद

विधान परिषद निवडणुकीतील घडामोडी, पालकमंत्रीपदाबाबतच्या चर्चांवर उपस्थित केलेले प्रश्न आणि “व्यक्तीस्वार्थ” तसेच “काही सुपुत्र” या शब्दप्रयोगांमधून महेंद्र दळवी यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले. या वक्तव्यांमधून त्यांनी विकास गोगावले आणि भरत गोगावले यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत पक्षांतर्गत राजकीय घडामोडींवर भाष्य केले असून, त्यामुळे कोकणातील महायुतीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

भावनिक पोस्ट

दरम्यान, कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी दळवी यांनी आपली कन्या जुईली जुईकर-दळवी हिचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र शिवसेना पक्षप्रमुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर दळवी यांनी हा अर्ज मागे घेतला. यानंतर महेंद्र दळवी यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“माझ्या तमाम कोकणवासीयांना माझा सप्रेम नमस्कार” अशा शब्दांत सुरू झालेल्या या पोस्टमध्ये दळवी यांनी गेल्या काही दिवसांतील संघर्ष हा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून कोकणाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी असल्याचे म्हटले आहे. तसेच आपल्या राजकीय प्रवासातील एका पर्वाचा अंत आपण स्वतः केला होता, तर आज दुसऱ्या एका राजकीय पर्वाचाही अंत झाला असता, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.

यासोबतच “कोकणातील माझ्याच काही नेत्यांनी माझा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न केला” असे नमूद करत त्यांनी पक्षातील काही नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. मात्र जनतेचे प्रेम, कार्यकर्त्यांची साथ आणि वरिष्ठांबद्दलचा आदर यामुळे आपण खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

उद्याचा सूर्य माझ्या कोकणवासियांचा…

“राजकारणात चढ-उतार होत राहतात, पण जनतेचा विश्वास कायम राहतो. कोकणाची सेवा हेच माझे ध्येय आहे आणि यापुढेही त्याच प्रामाणिकपणाने आपल्या सेवेत राहणार आहे,” असे सांगत दळवी यांनी “आजचा दिवस कोकणवासीयांचा नसला तरी येणारा उद्याचा सूर्योदय माझ्या कोकणवासीयांचा असेल” या भावनिक संदेशाने आपल्या पोस्टची सांगता केली आहे. त्यांच्या या पोस्टची सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

Follow Us