Rajan Salvi | माझी निष्ठा उद्धव ठाकरेंच्या पायाशी, मरेपर्यंत शिवसेनेत राहणार, राजन साळवींनी बंडखोरीच्या चर्चा नाकारल्या

| Updated on: Aug 19, 2022 | 4:07 PM

आपण शिवसेना सोडणार नाही, असे सांगतानाच राजन साळवी यांनी यापुढे शिवसेनेचा उपनेता म्हणून राज्यभरातील शिवसैनिकांची भेट घेणार असल्याचं म्हटलं

Rajan Salvi | माझी निष्ठा उद्धव ठाकरेंच्या पायाशी, मरेपर्यंत शिवसेनेत राहणार, राजन साळवींनी बंडखोरीच्या चर्चा नाकारल्या
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

रत्नागिरीः शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पायाशी माझी निष्ठा आहे. मी त्यांच्याशीच प्रामाणिक आहे आणि अखेरपर्यंत शिवसेनेतच (Shivsena) राहणार, असं वक्तव्य कोकणातील शिवसेना आमदार राजन साळवी  (Rajan Salvi) यांनी केलंय. राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याच्या बातम्या कालपासून येत होत्या. राजन साळवी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याचीही चर्चा होती. मात्र मी अशा प्रकारे कोणतीही भेट घेतली नसून माझ्या बाबतीत अशा अफवा पसरवल्याबद्दल दुःख वाटत असल्याची प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली. साळवी जर खरोखरच शिंदे गटात गेले तर कोकणात विजयी होण्यासाठी शिवसेनेसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं असतं.

काय म्हणाले राजन साळवी?

आपण शिंदे गटाच्या वाटेवर नाहीत, हे स्पष्ट सांगताना राजन साळवी म्हणाले, कालपासून माझ्यापर्यंत बातम्या येत होत्या. गेले ४० वर्ष मी शिवसैनिक म्हणून काम करतोय. शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, तीन वेळेचा आमदार आणि उपनेता म्हणून महाराष्ट्रात काम करतोय. राजकीय घडामोडींमुळे अशी चर्चा असतील. पण माझी निष्ठा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या पायाशी आहे. मी प्रामाणिकपणे ठाकरेंसोबत आहे. मी खुलासा करतोय.. मरेपर्यंत उद्धवसाहेब, आदित्य साहेबांसोबत काम करणार आहे. तोच माझा अंत आहे.

हे सुद्धा वाचा

उपनेता म्हणून राज्यभर दौरा करणार…

आपण शिवसेना सोडणार नाही, असे सांगतानाच राजन साळवी यांनी यापुढे शिवसेनेचा उपनेता म्हणून राज्यभरातील शिवसैनिकांची भेट घेणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, ‘ विधिमंडळाच्या अधिवेशनात मी पहिल्या दिवशी सहभाग घेतला. नंतर मी आदित्य ठाकरेंसोबत दौऱ्यावर होतो. अलिबाग, महाडच्या विधानसभा मतदार संघात गेलो. तेथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपनेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना बांधणीसाठी काम करणं ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात मी राज्यभर सहभागी होत आहे. भविष्यातही शिवसेनेचा उपनेता म्हणून मी राज्यभर दौरा करणार.

… तर कोकणातून शिवसेनेसमोर आव्हान

राजन साळवी यांनी कोकणातील इतर आमदारांप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या गटात शामिल होण्याच्या चर्चांना पूर्ण विराम दिलाय. मात्र अखेरच्या काही आमदारांप्रमाणे आधी नकार देऊन नंतर पुन्हा होकार देण्याची स्थितीदेखील उद्भवू शकते. दीपक केसरकर, उदय सामंत यांसारख्या प्रभावी नेत्यांना आधीच शिवसेनेने गमावले आहे. नुकतीच शक्यता नाकारली असली तरीही राजन साळवी काही काळानंतर शिंदे गटात गेल्यास उद्धव ठाकरेंना कोकणातून बंडखोरीची मोठी किंमत मोजवी लागेल, असे म्हटले जात आहे.