लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी, सुमारे 3 हजाराहून अधिक… काय आहे नेमकं?

जुलैमध्ये सुरू झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविकांना अर्ज भरण्यासाठी प्रति अर्ज ५० रुपये देण्याचे जाहीर झाले होते. मात्र, चार महिने उलटूनही त्यांना मोबदला मिळालेला नाही.

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी, सुमारे 3 हजाराहून अधिक... काय आहे नेमकं?
लाडकी बहीण योजना
| Updated on: Dec 20, 2024 | 12:23 PM

जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ घोषित केली. त्याअंतर्गत पात्र ठरलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना शासनाकडून दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात. गेल्या पाच महिन्यात अडीच कोटींपेक्षा अधिक महिलांनी या योजेनचा लाभ घेतला असून त्यांच्या खात्यात आत्तापर्यंत 7500 रुपये जमा झाले आहेत. तसेच आमचं सरकार पुन्हा निवडून आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये देऊ असं महायुतीतर्फे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगण्यात आलं.

या योजनेचा कोट्यवधी महिलांनी लाभ घेतला आणि महायुतीला भरघोस मतदान करत त्यांना पुन्हा निवडून दिलं. मात्र ‘लाडक्या बहिणींची’ या योजनेची अंमलबावणी करण्यात महत्वाची भूमिका असणाऱ्या , त्या ‘लाडक्या बहिणींचे’ अर्ज भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविका मात्र त्यांच्या मोबदल्यापासून वंचित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रती अर्जामागे 50 रुपये देण्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र ही योजना सुरू होऊन चार महिन्यांहून अधिक काल उलटून गेला, तरी अजूनही अंगणवाडी सेविकांना त्यांचा मोबदला मिळालेला नाही.
इतके महिने उलटूनही मोबदल्याचे पैसे न मिळाल्याने अंगणवाडी सेविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘लाडक्या बहिणींचे’ अर्ज भरून घेणाऱ्या ताई मात्र वंचित, अंगणवाडी सेविकांना मोबदलाच नाही

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही जुलै महिन्यात जाहीर झाली. त्या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्याचे काम अंगणवाडी सेविकांवरही सोपवण्यात आलं होतं. हे अर्ज भरून घेण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी प्रती अर्ज 50 रुपये देण्यात येतील असे सरकारने जाहीर केलं होतं. योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ देता यावा हा त्यामागचा मूळ उद्देश होता. त्यानंतर अंगणवाडी सेविकांनी आपलं नेहमीचं काम सांभाळत लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज भरून घेण्याची कामगिरीही पार पाडली. दिवस-रात्र अनेक अडचणींचा सामना करत, प्रामाणिकपणे काम करत लाडक्या बहिणी योजनेचे अर्ज भरण्याचं काम त्यांनी केलं.

लाडक्या बहिणींना तर पैसे मिळाले पण आमचा मोबदला कधी ?

या योजनअंतर्गत राज्यातील कोटय्वधी महिलांना गेल्या 5 महिन्यात 7500 रुपये तर मिळाले पण चार महिने झाले तरी अंगणवाडी सेविकांना एकही अर्ज भरून घेतल्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. सरकारकडून त्यांना पैसे देण्यात आलेला नाही. जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मोबदल्यापासून वंचित आहेत. जिल्ह्यात साडेतीन हजार पेक्षा जास्त अंगणवाडी सेविका आहेत. मात्र त्यांच्यापैकी कोणत्याही अंगणवाडी सेविकेला या लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्याचा मोबदला देण्यात आला नाही. तो मोबदला मिळल मिळेल असे सांगितले जात आहे, मात्र चार महिने उलटूनही मोबदला न मिळाल्याने अंगणवाडी सेविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रामाणिकपणे दिवस-रात्र काम करूनही पैसे न मिळाल्याने अंगणवाडी सेविकांनी नाराजी व्यक्त केली. लाडक्या बहिणींना तर त्यांचे पैसे मिळाले, पण आम्हाला आमचा मोबदला कधी मिळणार असा सवाल अंगणवाडी सेविकांकडून विचारण्यात येत आहे. आमच्या मेहनतीचे पैसे लवकरात लवकर मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.