Ambadas Danve | अंबादास दानवे शरद पवारांच्या भेटीला, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद स्वीकारल्यानंतर पहिलीच भेट

मराठवाड्यातील मूळ शिवसेनेचा बुलंद आवाज आता विधान परिषदेतही मविआची भूमिका अधिक आक्रमकपणे मांडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.

Ambadas Danve | अंबादास दानवे शरद पवारांच्या भेटीला, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद स्वीकारल्यानंतर पहिलीच भेट
शरद पवार यांच्या भेटीला आ. अंबादास दानवे आणि आ. सतीश चव्हाण
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 17, 2022 | 7:42 PM

मुंबईः विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. अंबादास दानवे हे औरंगाबाद शिवसेनेचे आक्रमक नेते असून नुकतीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची वर्णी लागली आहे. विधानपरिषदेत महाविकास आघाडी अर्थात विरोधी पक्षांची भूमिका मांडण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच आजच महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनालाही सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमागे कोणताही राजकीय अजेंडा नसून ही सदिच्छा भेट असल्याचं दानवे यांनी सांगितलं. या भेटीच्या वेळी औरंगाबादचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण हेदेखील उपस्थित होते.

अंबादास दानवेंवर महत्त्वाची जबाबदारी

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुंबई, ठाण्यानंतर औरंगाबाद शिवसेनेत उभी फूट पडली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक पाच आमदार एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे एकेकाळी शिवसेनेचा गड असलेल्या औरंगाबादेत शिवसेनेचं मोठं नुकसान झालं आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी औरंगाबादमधीलच विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातर्फे महत्त्वाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. त्यानुसार, विधानपरिषदेत उद्धव ठाकरेंतर्फे दानवेंच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. आता त्यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मराठवाड्यातील मूळ शिवसेनेचा बुलंद आवाज आता विधान परिषदेतही मविआची भूमिका अधिक आक्रमकपणे मांडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.

पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

आजपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनला सुरुवात झाली. महाराष्ट्रात शिवसेनेत बंड झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. 40 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचं लक्ष आहे. आज अधिवेशनाच्या सुरुवातीला विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी बंडखोर आमदार आणि मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर काही काळ विधानसभेचं कामकाज झालं. राज्यात आता सरपंचांची निवड थेट जनतेतून केली जाणार असल्याच्या विधेयकाला आज मंजुरी देण्यात आली. त्यानंतर काही वेळात अधिवेशन उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं. आता उद्या म्हणजेच गुरुवारी सभागृहात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होतेय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.