मराठवाड्यात ‘पदवीधर’मध्ये महायुतीची झोप उडाली; मविआ उमेदवाराची गेमचेंजर आघाडी, रविराज साबळेंना किती मते?
मराठवाड्यात 'पदवीधर'मध्ये महायुतीची झोप उडाली आहे. महाविकास विकास आघाडीच्या उमेदवाराने गेमचेंजर आघाडी घेतली आहे. या मतदारसंघात साबळेंना किती मते मिळाली, जाणून घ्या.

छत्रपती संभाजीनगरमधील मराठवाड्यातील पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील यांनी एकतर्फी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. प्रतापसिंह पाटील यांनी तब्बल 13 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराने गेमचेंजर आघाडी घेतल्याने महायुतीची झोप उडाली आहे. या मतमोजणीने सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली आहे. या मतदारसंघात युवा शेतकरी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रविराज साबळे यांनीही चांगली मते घेतली आहेत.
मराठवाड्यातील पदवीधर मतदारसंघात दुसऱ्या पसंतीची मतमोजणीची कोटा निश्चित झाला आहे. मतमोजणीत 88 हजार 558 मतांचा कोटा ठरवण्यात आला आहे. एकूण वैध 177115 आहेत. तर अवैध मते 16540 इतकी आहेत. प्रतापसिंह पाटील यांना 73931 मते मिळाली आहेत. रविराज साबळे यांना 19835 मते मिळाली आहेत. तर महायुतीचे सतिश चव्हाण हे दुसऱ्या क्रमाकांवर फेकले गेले आहेत. या मतदारसंघात प्रतापसिंह पाटील 13163 मताने आघाडीवर आहेत. मतमोजणीत आघाडी घेतल्यानंतर डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
डॉ. प्रतापसिंह पाटील म्हणाले, ‘आता दुसरी फेरी झालेली आहे. माझ्या माहितीस्तव 11000 मतांनी मी पुढे आहे. मी आता आत जातोय. मी तिसऱ्या फेरीनंतर तुम्हाला अधिकृत कळवतो. आता 12 वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होतील आणि काल ज्या पद्धतीने म्हटलं की, महाविकास आघाडीचा विजय हा शंभर टक्के आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या मताची यावेळेस मोजणी करण्याची शक्यता असणार आहे का, बहुतेक करावी लागणार आहे. परंतु तिसऱ्या फेरीचा निकाल आल्यानंतर आणखी चित्र स्पष्ट होईल.
‘आम्ही मुसंडी मारण्याचे मुख्य कारण ही पदवीधरांची ताकद आहे. त्यांनी दाखवलेली लोकशाही वरची निष्ठा आहे. महाविकास आघाडी ही अतिशय ताकदीने लढलेली आहे. महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्ते यांनी अगदी ग्राउंड लेव्हलवर जाऊन काम केलेले आहे. आम्ही घरामध्ये सहा डॉक्टर आहोत. आम्हाला पहिल्यापासून जनसंपर्काची सवय आहे. त्यामुळे आम्ही परफेक्ट नियोजन केले होते, त्याचाच हा निकाल दिसतो. जनतेनेच ही निवडणूक हातात घेतलेली होती. जनतेला जर गृहीत धरलं, तर त्याचा निकाल इथेच नाही, तर याच्यापूर्वी सुद्धा आजच्या पद्धतीने लागलेला आहे, आज पण त्याच पद्धतीने आलेला आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.