
रायगड : आज जाहीर होणारे ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हे भाजपासाठी भविष्याच्या दृष्टीने चांगले संकेत आहेत. त्याचवेळी शरद पवार गट आणि ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. कारण 2359 ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गटाला अजून शंभरीचा आकडा सुद्धा गाठता आलेला नाहीय. पवार गटाची सुद्धा हीच स्थिती आहे. त्याचवेळी भाजपासोबत आलेला शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट यांच्यामुळे भाजपाला फायदा झाल्याच चित्र आहे. भाजपा खालोखाल अजित पवार गटाने त्यानंतर शिंदे गटाने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. या निकालामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कुठे सर्वाधिक जोर दिला, तर फायदा होईल हे सुद्धा लक्षात आलय.
दरम्यान ठाकरे गटासाठी आजचे निकाल धक्कादायक आहेत. ठाकरे गट शेवटच्या क्रमांकावर आहे. ग्रामीण भागात शिंदे गटाने चांगली कामगिरी केली आहे. जळगाव पाठोपाठ महाडमधूनही शिंदे गटासाठी चांगली बातमी आहे. हे असंच चित्र राहिलं, तर ठाकरे गटातून शिंदे गटात इनकमिंग आणखी जास्त वाढू शकतं. दुपारी 2 वाजेपर्यंत 2359 ग्रामपंचायतींपैकी भाजपाने सर्वाधिक 383, शिंदे गट 197, दादा गटाने 239 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला आहे. काँग्रेस 112, पवार गट 89 आणि ठाकरे गट 80 असे आकडे आहेत.
कोकणातून ठाकरे गटासाठी चांगली बातमी नाही
आजच्या निकालामुळे भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गटाचा उत्साह निश्चित वाढेल. त्याचवेळी तळ कोकणातून ठाकरे गटासाठी चांगली बातमी नाहीय. महाड या विधानसभा क्षेत्रात शिंदेंच्या शिवसेनेला 41 जागा मिळाल्या आहेत. अजित पवार गटाला 5, ठाकरे गटाला 7, शेकापला 3, ग्राम विकास आघाडीला 3 जागा मिळाल्या आहेत. महाडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांचं वर्चस्व कायम आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. तिथून ठाकरे गटासाठी चांगली बातमी नाहीय.