महाविकासआघाडीत पुन्हा नाराजीनाट्य, काँग्रेसचा मोठा नेता नाराज, वरिष्ठांकडे मागणी करत म्हणाला “माझी विनंती…”

गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीच्या घटक पक्षांकडून उमेदवारी जाहीर केली जात आहे. तर दुसरीकडे काही जागांमुळे आघाडीत बिघाडी होत असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे.

महाविकासआघाडीत पुन्हा नाराजीनाट्य, काँग्रेसचा मोठा नेता नाराज, वरिष्ठांकडे मागणी करत म्हणाला माझी विनंती...
नाना पटोले, शरद पवार, उद्धव ठाकरे
Image Credit source: ANI
| Updated on: Oct 27, 2024 | 4:14 PM

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीच्या घटक पक्षांकडून उमेदवारी जाहीर केली जात आहे. तर दुसरीकडे काही जागांमुळे आघाडीत बिघाडी होत असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे. नुकतंच काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. या तिसऱ्या यादीत अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून सचिन सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र आता सचिन सावंत यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

प्रसारमाध्यमांच्या व्यासपीठावर काँग्रेसची बाजू हिरीरीने मांडणारे प्रवक्ते आणि निष्ठावंत सचिन सावंत यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मिळालेली उमेदवारी नाकारली आहे. तसेच त्यांनी याबद्दल नाराजी दर्शवत मतदारसंघ बदलून देण्याची मागणी केली आहे.

सचिन सावंत काय म्हणाले?

“मी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तिथेच लढावे अशी माझी इच्छा होती. परंतु तो मतदारसंघ शिवसेना उबाठा पक्षाकडे गेला आहे. मी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद! परंतु मी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नितला यांना पक्षाने निर्णय बदलावा याकरिता विनंती केली आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील ही आशा बाळगतो”, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

सचिन सावंत यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांना अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकासआघाडीतून वांद्रे पूर्व मतदारसंघ हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे गेला आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच जागेसाठी सचिन सावंतही आग्रही आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला याबद्दल काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपचे अमित साटम रिंगणात

दरम्यान अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अमित साटम हे महायुतीचे उमेदवार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अमित साटम यांनी 65,615 मते मिळवत काँग्रेसच्या अशोक जाधव यांना पराभवाची धूळ चारली होती. ते दोनवेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे आता काँग्रेसकडून अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवार बदलला जाणार की सचिन सावंत यांना लढण्याचा आदेश दिला जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.