Maharashtra BJP : पराभव जिव्हारी लागला, महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडून मंत्र्यांची कानउघडणी, पुढच्या सात दिवसात तुम्ही..

Maharashtra BJP : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर पक्षांतर्गत झाडाझडती घेतली आहे. निवडणुक निकालानंतर भाजपकडून मंत्र्यांच्या कामाचे ऑडिट सुरु आहे.

Maharashtra BJP : पराभव जिव्हारी लागला, महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडून मंत्र्यांची कानउघडणी, पुढच्या सात दिवसात तुम्ही..
Ravindra Chavan
| Updated on: Nov 21, 2026 | 9:38 AM

विधान परिषद निवडणुकीतील पराभव भाजपने गांभीर्याने घेतला आहे. मागच्या महिन्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक झाली. त्यात भाजपला दोन ठिकाणी मोठा फटका बसला. पुणे शिक्षक मतदारसंघाचा अपवाद वगळता पदवीधर मतदारसंघाच्या दोन जागा भाजपने गमावल्या. पुणे पदवीधर, नागपूर पदवीधरची जागा भाजपने गमावली. महायुतीला दोन तर महाविकास आघाडीने तीन जागा जिंकल्या. राज्यात आणि केंद्रात सत्ता असूनही भाजपला जिंकता आलं नाही. भाजपने ही बाब खूपच गांभीर्याने घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर पक्षांतर्गत झाडाझडती घेतली आहे. निवडणुक निकालानंतर भाजपकडून मंत्र्यांच्या कामाचे ऑडिट सुरु आहे.

संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कान उघडणी केली. मंत्री म्हणून पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांना काय दिलं याचा लेखाजोखा मांडण्यास सांगितलं. पुढील सात दिवसात अहवाल सादर करून बैठकीला उपस्थित राहा असे पक्ष नेतृत्वाचे सर्व मंत्र्यांना आदेश दिले. पक्ष संघटना सर्वोच्च असून त्यामुळेच आपण मंत्री आहोत हे विसरू नका असा रविंद्र चव्हाणांनी सर्व मंत्र्यांना इशारा दिला.

Loading...

सहकार्य असतं तर निकाल वेगळा असता

विधान परिषद निवडणुकीच्या या निकालानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेत आपसात आरोप-प्रत्यारोप सुरु झालेले. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी मित्र पक्ष म्हणून शिंदे शिवसेनेकडून अपेक्षित सहकार्य मिळालं नाही असा निशाणा साधला. सहकार्य असतं तर निकाल वेगळा लागला असता असा दावा त्यांनी केला. बन यांच्या या प्रतिक्रियेनंतर शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरु झालेली.

महायुतीमधील विसंवाद समोर आला

एकनाथ शिंदे शिवसेना पुणे शिक्षकच्या जागेसाठी आग्रही होती. पण ही जागा भाजपला सोडावी लागली. म्हणून पुणे शिक्षकमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली. शिंदे शिवसेनेने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. पुण्यातली शिंदे शिवसेनेची मत पदवीधरमध्ये मिळाली असती तर पुण्यात पदवीधरची जागा जिंकता आली असती असं भाजपचं म्हणणं होतं. आता हा विषय शांत झाला असला तरी यामुळे महायुतीमधील विसंवाद समोर आला.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us