
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यंदा महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला आहे. यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल ९६.१४ टक्के इतका लागला आहे. तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३१ टक्के इतकी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना कोणकोणते पर्याय देण्यात आले आहेत, याबद्दलची माहिती दिली आहे.
दहावीतील बोर्डाच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार किंवा गुणसुधार योजनेनुसार अकरावीत प्रवेश करता येणार आहे. बोर्डाने याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे. महाराष्ट्र बोर्डाने श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजना सुरु केली आहे. या परीक्षेत सर्व विषयात पास झालेला विद्यार्थी यानंतरच्या तीन परीक्षेसाठी पात्र होऊ शकतो. फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये पास झालेला विद्यार्थी हा जून जुलै २०२५ परीक्षा, फेब्रुवारी मार्च २०२६ आणि जून जुलै २०२६ च्या परीक्षेला श्रेणी सुधारतंर्गत या तिन्ही परीक्षेसाठी किंवा तिन्हीपैकी एका परीक्षेसाठी तो पुन्हा प्रविष्ठ होऊ शकतो, असे शरद गोसावी यांनी म्हटले.
तसेच दहावीसाठी ATKT लागू केली आहे. जर एखादा विद्यार्थी एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झाला तरी त्याला 11 वीमध्ये प्रवेश दिला जातो. याला allowed to keep terms म्हणजेच ATKT दिली जाते. यानुसार तो विद्यार्थी अकरावीत अॅडमिशन घेऊ शकतो. मात्र बारावीत प्रवेश घेण्यापूर्वी त्याला दहावी उत्तीर्ण होणे गरजेचे असेल. हा विद्यार्थी जून-जुलैची २०२५ किंवा फेब्रुवारी मार्च २०२६ ची परीक्षा जर तो उत्तीर्ण झाला आणि अकरावीची परीक्षा उत्तीर्ण झाला तर तो बारावी परीक्षेला प्रवेश घेण्यास पात्र ठरु शकतो, असेही शरद गोसावींनी म्हटले.