
वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद केली. अजित पवारांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केली. ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अत्यंत बोगस अर्थसंकल्प असे म्हणत टोला लगावला.
राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केलाय कर्जबाजारी असे उद्धव ठाकरे म्हणाले. मला आज अत्रे यांची आठवण आणि ते असते तर आज बोलले असते एवढ्या दहा वर्षात बोगस अर्थसंकल्प पाहिला नव्हता, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी घणाघात केला.
“मला आज अत्रे यांची आठवण झाली. ते असते तर आज बोलले असते, एवढ्या दहा वर्षात बोगस अर्थसंकल्प पाहिला नव्हता. सार काढायच झालं तर उद्या सूर्य उगवणार आहे. त्यातून तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळणार आहे असा अर्थसंकल्प आहे. मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केलाय कर्जबाजारी ही ओळ त्यांनी घेतली पाहिजे. आम्ही थापा मारु असं त्यांच सुरु आहे. बहुमत मिळालेलं हे सरकार आहे. दहा थापा होत्या ते आज यांनी केलंय का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
“शेतकऱ्यांना कर्जमाफी यांनी केलीय का? शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी झालेली नाही. प्रत्येकाला अन्न आणि निवारा केव्हा देणार…? तुमचं सरकार स्थिर असताना जीवनावश्यक वस्तू स्थिर केव्हा ठेवणार…? आजच्या अर्थसंकल्पमध्ये काय आहे सामान्य माणसासाठी, काही नाही पण कॉन्ट्रॅक्टरसाठी खूप काही आहे”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
“दोन विमानतळ जोडण्याचे कामही सरकार करणार म्हटले आहेत. पण हे अदानीचे काम आहेत तुम्ही तुमच्या मालकाची काम करणार आहात का? शेतकऱ्यांना मोफत विजेची घोषणा केली. पण आता शेतकऱ्यांना बिल यायला लागली त्याच तुम्ही काय करणार आहात? थापानामा किंवा झोलानामा म्हणा. त्यांनी 2024 निवडणुकीत बोलले होते, त्यातील एक गोष्ट तरी आज केलीय का?” असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला.
“अत्यंत बोगस अर्थसंकल्प आहे. असा अर्थसंकल्प गेल्या दहा वर्षात पाहिला नाही. मारल्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.