Devdedra Fadnavis : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

सीआयडीच्या आरोपपत्रातून वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य मास्टर माइंड असल्याच स्पष्ट झालय. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. आपल्या पीए मार्फत त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवून दिला.

Devdedra Fadnavis : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis
| Updated on: Mar 04, 2025 | 12:56 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो काल समोर आले. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर आज महाराष्ट्राच्या राजकारणात काही महत्त्वाच्या घडामोडी घडतील अशी अपेक्षा होती, तसं घडलं सुद्धा आहे. मागच्या दोन महिन्यांपासून अनेकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. आज अखेर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. कारण संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. सीआयडीच्या आरोपपत्रात वाल्मिक कराडच मास्टर माइंड असल्याच स्पष्ट झालय. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. आपल्या पीए मार्फत त्यांनी हा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवून दिला.

काल हे फोटो समोर आल्यानंतर रात्री देवगिरीवर एक महत्त्वाची बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर मोठी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती होती. मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे राजीनामा मागितल्याच बोलल जात होतं. त्यानुसार धनंजय मुंडे यांनी आज सकाळी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भात माहिती दिली आहे. “आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे. पुढील कार्यवाही करता हा राजीनामा राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारुन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आहे” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

अजित पवार काय म्हणाले?

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर विधान भवनाकडे निघालेल्या अजित पवार यांना पत्रकारांनी गाठलं. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. “तुम्हाला काहीही माहित नाही. उगाच काही प्रश्न मला विचारु नका. मी विधान भवनात चाललो आहे तिथे गेल्यावर सांगतो काय ते” असं अजित पवार म्हणाले. अजित पवार विधान भवनात आल्यानंतर ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीला पोहोचले.