लसीकरण या एकाच मंत्राने तिसरी लाट थोपवता येईल, आरोग्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन

| Updated on: Jun 29, 2021 | 5:51 PM

कुठल्याही स्थितीत लसीकरणाला अग्रक्रम द्यावा लागेल. तिसरी लाट येईल तेव्हा येईल, पण त्यापूर्वी आपण महाराष्ट्राला 70 टक्के लसीकरण केलं तर येणाऱ्या लाटेची गंभिरता तेवढी राहणार नाही, असं टोपे यांनी म्हटलंय.

लसीकरण या एकाच मंत्राने तिसरी लाट थोपवता येईल, आरोग्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us on

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे राज्यात चिंताजनक स्थिती निर्माण झालीय. अशावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील नागरिकांना महत्वाचं आवाहन केलं आहे. कुठल्याही स्थितीत लसीकरणाला अग्रक्रम द्यावा लागेल. तिसरी लाट येईल तेव्हा येईल, पण त्यापूर्वी आपण महाराष्ट्राला 70 टक्के लसीकरण केलं तर येणाऱ्या लाटेची गंभिरता तेवढी राहणार नाही, असं टोपे यांनी म्हटलंय. टोपे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला आवाहन केलंय. (Rajesh Tope urges citizens to get corona vaccine)

महाराष्ट्रातील सुजान नागरिकांना विनंती आहे की, लसीकरण या एकाच मंत्राने आपल्याला तिसरी लाट थोपवता येऊ शकेल. त्यामुळे नागरिकांना कोरोनाची लस घ्यावी. लसीचा पहिला डोस घेतलेल्यांची संख्या अधिक आहे. पण दुसऱ्या डोसकडे नागरिक दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, नागरिकांना दुसरा डोस घ्यायलाच हवा, अशी विनंतीही टोपे यांनी केली आहे. राज्यात आरटीपीसीआर चाचण्यांची रोजची क्षमता दोन लाखापर्यंत आहे. रोज तेवढ्या टेस्ट व्हाव्या, अशी सूचना आरोग्य विभागाला दिल्याचं टोपे यांनी सांगितलं. लोकांनीही टेस्टिंगसाठी पुढे येण्याचं आवाहन त्यांनी केलंय.

त्याचबरोबर राज्यात सर्वच जिल्ह्यांना आता तिसऱ्या लेव्हलमध्ये आणलं आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यात तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. प्रशासनाने त्याकडे लक्ष द्यावं, नागरिकांनाही प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्याचं आवाहन टोपे यांनी केलंय.

‘डेल्टा प्लसची स्थिती सध्या चिंताजनक नाही’

डेल्टा प्लसच्या संदर्भात दर आठवड्याला प्रत्येक जिल्ह्यात 100 सॅम्पल्स घेतले जातात. आतापर्यंत 4 हजार लोकांचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं. त्यापैकी डेल्टा प्लसचे 21 रुग्ण आढळून आले. त्यातील एकाचा मृत्यू झाला. मात्र, अन्य रुग्ण बरे झाले आहे. डेल्टा प्लसचे नेमके गुणधर्म अद्याप लक्षात येत नसल्याचं टोपे म्हणाले. डेल्टा प्लसच्या संदर्भात देशात एकूण 48 रुग्ण आहेत. त्यामुळे डेल्टा प्लसवर तेवढी काळजी करण्याची गरज नसल्याचंही टोपे म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेची सरस कामगिरी

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी तिसऱ्या लाटेसाठी सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईत केवळ 35 दिवसात 2170 बेडच्या कोव्हिड रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिकेकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहे.

संबंधित बातम्या :

टीव्ही 9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, औरंगाबादेत लसीकरणासाठी नागरिकांना टोकनचे वाटप

Delta Plus Update : महाराष्ट्राला मोठा दिलासा, जळगावसह रत्नागिरीतील रुग्णांची डेल्टा प्लसवर मात

Rajesh Tope urges citizens to get corona vaccine