Maharashtra Elections 2025 : बायको की सून? मतदारांचा कौल कुणाला? पश्चिम महाराष्ट्रात नेमकं काय घडलं?

Maharashtra Elections 2025 : नगर परिषद आणि नगरपंचायतीवर आपलचं वर्चस्व राहावं म्हणून प्रत्येक नेत्याची धडपड सुरू आहे. त्यासाठी कुणी रिंगणात बायकोला उभं केलंय, तर कुणी सुनेला उमेदवारी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रात नेमकं काय घडतय चला जाणून घेऊया...

Maharashtra Elections 2025 : बायको की सून? मतदारांचा कौल कुणाला? पश्चिम महाराष्ट्रात नेमकं काय घडलं?
Paschim Maharashtra
Image Credit source: Tv9 Network
Updated on: Dec 01, 2025 | 6:49 PM

सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे. नगराध्यक्षपद हे यावेळी थेट जनतेतून निवडले जाणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षाने आपल्या ताकदवान उमेदवाराला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतीवर आपलचं वर्चस्व राहावं म्हणून प्रत्येक नेत्याची धडपड सुरू आहे. त्यासाठी कुणी रिंगणात बायकोला उभं केलंय, तर कुणी सुनेला उमेदवारी देऊन आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात तर नात्यागोत्यांमध्ये जोरात रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कोणत्या सदस्यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज केले आहेत चला जाणून घेऊया सविस्तर…

राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा धुरळा सुरू आहे. कागल नगरपालिका निवडणुकीसाठी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे या कट्टर विरोधकांनी हातमिळवणी केल्याची चर्चा राज्यभरात सुरू असतानाच मुश्रीफ यांच्या सूनबाईंसाठी शिंदे गटाच्या उमेदवाराने माघार घेतली आहे. त्यांच्या नगरसेवपदाच्या मार्गातील अडथळाच दूर झाला आहे. हसन मुश्रीफ यांची सून सेहरनिदा मुश्रीफ यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. राज्याचे लक्ष लागून असलेल्या कागल नगर परिषदेत कट्टर विरोधक एकत्र आल्याने काहीशी चुरस कमी झालेली असली तरी अंतिम निवडणूक आणि निकालासाठी कार्यकर्ते नेते सज्ज आहेत.

करमाळा निवडणूक

पश्चिम महाराष्ट्रातील करमाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. नुकताच शिवसेना गटात प्रवेश करणारे माजी आमदार जयवंतराव जगताप धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढत आहेत. त्यांनी नगराध्यक्षपदासाठी पत्नी नंदादेवी जगताप यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. जगताप गटाची 1995 पासून म्हणजेच गेली 30 वर्षे नगरपरिषदेवर सत्ता आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनगर नगराध्यक्षपद

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंगळवेढा नगरपालिका आणि अनगर नगरपंचायत यांच्या निवड प्रक्रियेला स्थगिती आदेश दिले आहेत. अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. भाजपकडून राजन पाटलांची सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उज्ज्वला थिटे, तर सरस्वती शिंदे यांनी अपक्ष अर्ज केला होता. अर्जाच्या छाननीत उज्ज्वला थिटेंनी नामनिर्देशन पत्रात सूचकाची सही केली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता.

त्यानंतर थिटेंचा अर्ज अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती अनगर नगरपंचायतचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली. नंतर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंनीही अर्ज मागे घेतला आणि प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांना अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

फलटण नगरपरिषद

फलटण नगरपरिषद निवडणुकीत पुन्हा निंबाळकर विरुद्ध निंबाळकर अशी लढत रंगली आहे. या निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवारांचा पक्ष सोडला असून शिवसेना शिंदे गटाचे धनुष्यबाण स्विकारले आहे. रामराजे यांचे चिरंजीव अनिकेतराजे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांच्या प्रसारासाठी एकनाथ शिंदे आणि मंत्री शंभूराजे देसाई फलटणमध्ये दाखल झाले होते.

कोकण निवडणुका

कोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातच दोन गट पडल्याचे चित्र आहे. चिपळून येथून आमदार भास्कर जाधवांची मुलगी कांचन सुमित शिंदे ही नगरसेवक पदासाठी रिंगणात उतरली आहे. तर माजी आमदार रमेश कदम यांनी थेट नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे.

राजापूर नगराध्यक्षपदासाठी माजी आमदार हुस्नबानू खलिफे या निवडणूक रिंगणात आहेत. माजी आमदार हुस्नबानू खलिफे या विधान परिषद सदस्य राहिल्या आहेत. काँग्रेसने त्यांना संधी दिली होती. आता त्या काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत आहेत.

माजी आमदार बाळ माने यांची सून शिवानी सावंत माने देखील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुक रिंगणात आहे. शिवानी सावंत माने यांचे वडील राजेश सावंत, जे भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष होते, त्यांनी आपली मुलगी विरोधी पक्षातून निवडणूक लढवत असल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.