Maharashtra Epstein Files controversy: महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सच्या अडचणी संपायचे नाव घेईना, थेट सेन्सॉर बॉर्डाकडेच तक्रार
Maharashtra Epstein Files controversy: ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटाबाबत मोठा वाद सुरु आहे. या चित्रपटातील एका सीनवर आक्षेप घेत थेट सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटात कथीत भोंदूबाबा अशोक खरातची कथा दाखवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता एका सीनवरून वाद पेटला आहे. हिंदू धार्मिक प्रतीकांचा वापर केल्याप्रकरणी आक्षेप घेण्यात आला आहे. आता नेमकं काय झालं? वाचा…
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या नावाने सध्या प्रसारित होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये हिंदू धार्मिक प्रतीकांचा वापर केल्याप्रकरणी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडे (CBFC) अधिकृत आक्षेप नोंदवण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड येथील ॲड. प्रदीप नाईक यांनी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील CBFC च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात लेखी निवेदन सादर केले आहे. या निवेदनासोबत जोडलेल्या सुमारे २७ सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपच्या सुरुवातीलाच टेबलावरील एका पत्रिकेवर श्री गणेशाची प्रतिमा दिसत असल्याचे नमूद केले आहे. तसेच, पुढील दृश्यांच्या पार्श्वभूमीतील सजावट एखाद्या मंदिराची किंवा देवस्थानाची आहे का आणि ती दृश्ये नेमक्या कोणत्या संदर्भात दाखवली आहेत, याची सखोल चौकशी करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
कोणत्या गोष्टीवर आक्षेप?
एखाद्या व्यक्तीवरील कथित फसवणुकीचे आरोप दाखवताना त्या व्यक्तीचा संबंध हिंदू श्रद्धेशी जोडला जाईल अशा पद्धतीने हिंदू देवदेवतांच्या प्रतिमा, धार्मिक पत्रिका किंवा मंदिरांच्या दृश्यांचा वापर करणे अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. हिंदू धर्म, देवदेवता आणि धार्मिक भावनांना वारंवार लक्ष्य केले जात असल्याची खंत अनेक भाविकांमध्ये आहे. अशी दृश्ये संदर्भ सोडून प्रसारित केल्यास हिंदू धर्माची टिंगलटवाळी करणाऱ्यांना आयती संधी मिळेल आणि समाजात हिंदू धर्माबद्दल अनादर वाढण्याची शक्यता आहे, अशी भीतीही या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, अशोक खरात कोण आहेत, त्यांच्यावर नेमके कोणते आरोप आहेत आणि तपासाअंती त्यातून काय समोर येते, हा संबंधित तपास यंत्रणा व न्यायप्रक्रियेचा भाग असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. हा आक्षेप केवळ हिंदू देवदेवता आणि श्रद्धास्थानांच्या चुकीच्या वापरापुरता मर्यादित आहे. एका व्यक्तीवरील आरोपांच्या आडून संपूर्ण हिंदू धर्माची बदनामी केली जाऊ नये; श्री गणेशासह इतर देवदेवतांच्या प्रतिमा, धार्मिक पत्रिका किंवा मंदिरांची कोणतीही अवमानकारक मांडणी सहन केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका या निवेदनाद्वारे मांडण्यात आली आहे.