Arya Ghare : आमच्या आयुष्यात त्रास…’देऊळबंद’ फेम अभिनेत्रीचा वडिलांवर संताप, घेतला मोठा निर्णय
Aarya Ghare Post : अभिनेत्री आर्या घारेनं वडिलांचं नाव आणि आडनाव हटवलं असून त्यामागचं कारण सांगितलं आहे.

‘देऊळ बंद’ या मराठी चित्रपटात चिमुकल्या सनाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री आर्या घारे सध्या चर्चेत आली आहे. बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या आर्यानं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली होती. मात्र, आता तिच्या नावात बदल झाल्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. आर्यानं आपलं नाव बदलून ‘आर्या वैशाली’ असं केलं आहे. नावातील या बदलामागे नेमकं काय कारण आहे आणि वडिलांबद्दल तिने काय सांगितलं, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.अभिनेत्रीनं याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
आर्या घारेची पोस्ट
आर्या घारे म्हणाली की, ‘नमस्कार..आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे. कारण, आज मी माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा निर्णय तुमच्यासोबत शेअर करत आहे. काही निर्णय घेणं अजिबात सोपं नसतं. मी माझ्या आयुष्यातलं हे सत्य आतापर्यंत तुमच्यासोबत कधीच शेअर केलं नव्हतं. आज मी जो निर्णय घेतेय तो मला खूप आधी घ्यायचा होता पण, मी माझ्या आईमुळे घेतला नव्हता. पण आता असं वाटलं की बास! आता ती वेळ आलीये. आजपर्यंत ज्या नावानं आपल्याला लोकं ओळखतात, ज्या नावाने आपण मोठे झालो, जे नाव मोठं करण्यासाठी आपण इतके कष्ट घेतले ते नाव बदलणं अजिबात सोपं नसतं. पण कधी कधी स्वत:च्या अस्तित्वासाठी, स्वाभिमानासाठी काही निर्णय घ्यावे लागतात.’
‘ज्या व्यक्तीनं माझ्या आयुष्यात कधीच कोणती जबाबदारी पार पाडली नाही, कधीच माझ्यासाठी काहीच केलं नाही, उलट आजही जी व्यक्ती माझं, माझ्या आईचं वाईट कसं होईल? आमची बदनामी कशी होईल? याचा प्रयत्न करते. आमच्या आयुष्यात त्रास कसा निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न करत असते. त्या व्यक्तीचं नाव मी माझ्या ओळखीचा भाग म्हणून. माझ्या आयुष्यात अशी व्यक्ती आहे ना जिने स्वत:च्या वाटेत कितीही दु:ख, अडचणी, संघर्ष आले तरी माझ्या चेहऱ्यावरचं हसू कधीच कमी होऊ दिलं नाही. स्वत:च्या इच्छा बाजूला ठेवून माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. स्वत: खंबीर राहून मला जगायला शिकवलं. माझ्यासाठी माझ्या आईने जे काही केलं त्याची परतफेड मी कधीच करु शकणार नाही. माझ्या आयुष्यात जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा माझी आई होती. आज मी जे काही आहे ते फक्त तिच्यामुळेच.’
View this post on Instagram
‘म्हणूनच आजपासून, आतापासूनच माझं नाव असेल आर्या वैशाली. माझ्या आईचे कष्ट, तिचे संस्कार आणि तिचा त्याग हीच माझी खरी ओळख आहे. माझे सर्व सोशल मीडिया हँडल्स आता आर्या वैशाली ऑफिशियल या नावानं असतील. हेच माझं एकमेव ओरिजनल आणि ऑफिशियल आयडी आहे. जगानेही आता मला याच नावानं ओळखावं कारण माझ्या आईचं नाव माझ्या नावासोबत असेल तर त्यापेक्षा अभिमानाची गोष्ट कोणतीच नाही. आर्या वैशाली असण्याचा मला अभिमान वाटतो.’
‘तुम्हा सगळ्यांना ही गोष्ट कळेल आणि तुम्ही समजून घ्याल अशी आशा करते. इथून पुढे मला आर्या वैशाली याच नावाने आवाज द्यावा अशी माझी इच्छा आहे. ह्याच नावाने माझी ओळख व्हावी. आर्या घारे नाव मोठं होण्यासाठी मी जितके प्रयत्न केले त्यापेक्षा खूप खूप जास्त प्रयत्न मी आर्या वैशाली हे नाव मोठं करण्यासाठी करेन. श्री स्वामी समर्थ.’ असं अभिनेत्रीनं शेवटी म्हटलं आहे.
