मसाल्यांत कृत्रिम रंग आणि परकीय पदार्थांना बंदी; नियम मोडल्यास कारवाई होणार, तुकाराम मुंढेंकडून मोठी घोषणा
Tukaram Mundhe Action Against Adulteration in Spices: मसाल्यांतील भेसळीला आळा घालण्यासाठी FDA ॲक्शन मोडमध्ये आले आहे. तुकाराम मुंढे यांनी नवी नियमावली काढली आहे.

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. यात त्यांनी मोठी घोषणा केली आहे. एफडीएने मसाल्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील मसाल्यांबाबत एफडीएकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मसाल्यात रंग टाकल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी मसाल्यांमध्ये भेसळ आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर तुकाराम मुंढेंनी याबाबतचे नवे नियम सांगितले आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की,आपण राज्यभर काम करत आहोत. आपण अनेक ऑर्डर काढल्यात आणि त्यावर काम सुरू आहे. आज आपण मसाल्यांच्या बाबतीत नियमावली काढत आहोत. त्यात काही ठिकाणी भेसळ होते. असे मसाले खाल्ल्याने अनेकांना आरोग्याच्या समस्या झाल्या आहेत. राज्यातले मसाले उत्पादन आणि विक्रीबाबत आपण आज ऑर्डर काढत आहोत. उत्पादन प्रक्रिया वाहतुक आणी विक्रीसाठी आपण नियमावलीवर नवे नियम लागू करत आहोत.
ते म्हणाले की, कृत्रिम रंग परकीय पदार्थ आणी इतर गोष्टी टाकल्याने ग्राहकांना त्यातून धोका निर्माण होतो. हळद, मिरची, लवंग मसाले आणि मसाल्यापासून तयार केलेली उत्पादनांचा यात समावेश आहे. या मसाल्यांमध्ये प्रतिबंधित रंग आणी सामग्रीवर बंदी आहे. मसाल्यांमध्ये प्रतिबंधीत रंग वापरले तर कारवाई होणार आहे. मसाल्यामध्ये भुसा आणी रंगांनी भेसळ होत असल्याचे दिसून आले आहे. मसाल्यांची साठवणूक करणारी जागा चांगली स्वच्छ असावी.
तुकाराम मुंढेंनी सांगितले की, सुटे मसाले विक्री करता येत नाही. वैध परवान्याशिवाय मसाल्यांची विक्री करता येणार नाही. इथिलीन ऑक्साईडचा वापर प्रतिबंधित आहे. जर नियमाचा भंग केला तर कारवाई करणार आहे. 2006 नुसार दंड आणि कारावासाची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. सेफ फूड सेफ ड्रग्स अभियान महाराष्ट्रात सुरू करण्यात आलं आहे. मकोका लावला तसेच डेरी उत्पादनासंदर्भात आदेश पारित करण्यात आले.
त्यांनी पुढे सांगितले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कृत्रिम रंग, अर्क काढलेले मसाले आणि मसाल्यांमध्ये भेसळ करण्यास सक्त मनाई आहे. हळद, मिरची, दालचिनी, काळीमिरी, खसखस सगळ्यांचा मसाल्यांचा समावेश आहे. मसाले आणि मसाल्यांच्या उत्पादनांचा समावेश आहे. निर्माते, विक्रेते, हॉटेल व्यासायिक सगळ्यांवर अनुपालन आदेश बंधनकारक आहे.