
Gas Cylinder Shortage : इराण आणि इस्रायल युद्धामुळे जगात उर्जासंकट निर्माण झाले आहे. पश्चिमी देशांमध्ये इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने इंधनाने भरलेल्या जहाजांची वाहतूक थांबली आहे. यामुळे भारतात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा भाव चांगलाच वाढला आहे. दुसरीकडे दुसरीकडे नैसर्गिक वायुचाही तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्रही चांगलाच होरपळतोय. लोकांनी गॅस बुकिंग करूनही वेळेवर गॅस मिळत नाहीये. दुसरीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हॉटेल व्यावसायिक तसेच इतर व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना आता 20 टक्के गॅस पुरवठा होणार राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी तशी माहिती दिली आहे. राज्यातील हॉटेल, ढाबे,उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय, राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित कॅन्टीन, कम्युनिटी किचन्स यांच्यासाठी २० टक्के एलपीजी पुरवठा करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. या आदेशाचे पालन केले जाईल, असे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. व्यापारी एलपीजीच्या (Commercial LPG) वाटपाबाबत केंद्राच्या निर्देशामुळे हॉटेल चालकांना दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर राज्यात व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमधील हॉटेल व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालू होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा मात्र अजूनही कायम आहे. लोकांना घरगुती गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नाहीये. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरच्या काळ्या बाजाराची उदाहरणे समोर आली आहेत. तसेच एक गॅस सिलिंडर मिळावे यासाठी लोक अनेक ठिकाणी रांगा लावत आहेत. सरकार या अडचणीवर कशी मात करणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.