आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना मोठा झटका; फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय काय?
महाराष्ट्र सरकारच्या नवीन निर्णयानुसार, वयोमर्यादा किंवा शुल्कात सवलत घेणाऱ्या राखीव उमेदवारांना आता खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार नाही. सरकारी नोकरभरतीतील या मोठ्या बदलाचे सविस्तर तपशील वाचा.

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने शासकीय नोकरभरतीबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार, ज्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी स्पर्धा परीक्षेत वय, शैक्षणिक पात्रता किंवा परीक्षा शुल्कात सवलत घेतली आहे, त्यांना आता खुल्या प्रवर्गातील (Open Category) जागांवर दावा करता येणार नाही. अशा उमेदवारांची निवड केवळ त्यांच्यासाठी राखीव असलेल्या कोट्यातूनच केली जाईल.
नेमका निर्णय काय?
आतापर्यंतच्या नियमानुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवार जर गुणवत्ता यादीत (Merit List) वरच्या क्रमांकावर असेल, तर त्याला खुल्या प्रवर्गातील जागेवर नियुक्ती दिली जात असे. मात्र, नवीन नियमानुसार जर एखाद्या उमेदवाराने फॉर्म भरताना राखीव प्रवर्गासाठी असलेल्या सवलतींचा लाभ घेतला असेल, तर त्याला केवळ राखीव जागेसाठीच पात्र मानले जाईल. भलेही त्या उमेदवाराचे गुण खुल्या प्रवर्गातील कट-ऑफपेक्षा जास्त असले, तरी त्याला खुल्या प्रवर्गातील जागा मिळणार नाही. हा निर्णय एमपीएससी (MPSC), शिक्षक भरती, पोलीस भरती आणि सर्व सरळसेवा भरती प्रक्रियांना लागू असेल.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या महत्त्वपूर्ण प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे केवळ खुल्या प्रवर्गातून स्पर्धा करणाऱ्या उमेदवारांच्या संधी वाढणार असून त्यांना योग्य न्याय मिळणार आहे. एकदा आरक्षणाची सवलत (उदा. वयोमर्यादा) घेतल्यावर पुन्हा खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करणे तांत्रिकदृष्ट्या विसंगत मानले जात असल्याने हा बदल करण्यात आला आहे.
प्रशासकीय प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी आणि विविध न्यायालयीन निकालांचा आधार घेऊन आरक्षणाच्या नियमावलीत स्पष्टता निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे भरती प्रक्रियेतील पारदर्शकता वाढून खुल्या प्रवर्गातील गुणवत्ताधारक उमेदवारांना अधिक वाव मिळणार आहे.
कोणावर होणार परिणाम?
याचा परिणाम प्रामुख्याने SC, ST, OBC, SEBC या राखीव प्रवर्गावर होणार आहे. ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपली आहे आणि त्यांनी राखीव प्रवर्गाच्या आधारावर वाढीव वयाची सवलत घेऊन परीक्षा दिली आहे, त्यांना आता खुल्या प्रवर्गाच्या जागांवर हक्क सांगता येणार नाही. या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील जागा आता केवळ त्याच उमेदवारांसाठी उपलब्ध राहतील ज्यांनी कोणतीही सवलत घेतलेली नाही. यामुळे या प्रवर्गातील स्पर्धा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
विद्यार्थी वर्गात उमटणार प्रतिक्रिया
शासनाच्या या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. राखीव प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी, ज्यांनी केवळ वयोमर्यादेची सवलत घेतली आहे पण गुण जास्त मिळवले आहेत, त्यांना या निर्णयाचा फटका बसू शकतो. तर दुसरीकडे, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.