मुंबई-ठाण्यासह 5 जिल्ह्यांत उन्हाच्या कडाक्यामुळे आजाराचा धोका, 5 रुग्ण आढळले, तुमच्या जिल्ह्यात परिस्थिती काय?

महाराष्ट्रात उन्हाचा पारा ४० अंशांच्या पार गेला असून प्रशासनाने २.५ लाख लोकांची आरोग्य तपासणी केली आहे. उष्माघाताचे ५ रुग्ण आढळले असून एप्रिल-मे महिन्यात उष्णता वाढण्याचा इशारा दिला आहे.

मुंबई-ठाण्यासह 5 जिल्ह्यांत उन्हाच्या कडाक्यामुळे आजाराचा धोका, 5 रुग्ण आढळले, तुमच्या जिल्ह्यात परिस्थिती काय?
heat stroke
| Updated on: Mar 30, 2026 | 8:12 AM

राज्याच्या अनेक भागात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे. फेब्रुवारीच्या मध्यापासून वाढलेल्या या उन्हाचा फटका नागरिकांच्या आरोग्याला बसू लागला आहे. आतापर्यंत राज्यभरात २ लाख ५० हजार ८३२ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यात ५ जणांना उष्माघाताची बाधा झाल्याची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. आता येत्या एप्रिल आणि मे महिन्यात ही परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

तपासणीचा वेग वाढला

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यभर विशेष पथके तैनात केली आहेत. यासाठीच्या आरोग्य तपासणी केली जात आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ४५,२९९ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. तर राजधानी मुंबईत ५१,८२६ जणांची आरोग्य चाचणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यासोबतच पालघर, पुणे, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यातही उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे या ठिकाणाही युद्धपातळीवर सर्वेक्षण सुरू आहे.

पाच जिल्ह्यांत उष्माघाताचे रुग्ण; सर्वांची प्रकृती स्थिर

राज्यात आतापर्यंत उष्माघाताचे ५ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पालघर (२), रायगड (१), नाशिक (१) आणि जळगाव (१) येथील रुग्णांचा समावेश आहे. सुदैवाने या सर्वांवर तातडीने उपचार करण्यात आले असून त्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत राज्य सरकारने विशेष कृती आराखडा (Action Plan) राबवण्यास सुरुवात केली आहे. यानुसार काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सर्व जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये हिट स्ट्रोक वॉर्ड म्हणजेच स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरु करण्यात आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत ओआरएस (ORS) आणि अत्यावश्यक औषधांचा साठा पोहोचवण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाला ठिकठिकाणी पाणपोई आणि सावलीची सोय करण्याचे निर्देश दिले आहेत.

उन्हापासून कसा कराल बचाव?

तहान नसली तरी दर तासाला पाणी प्या. लिंबू पाणी, ताक आणि नैसर्गिक पेयांचा आहारात समावेश करा.

दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो कडक उन्हात जाणे टाळा. बाहेर जाणे अनिवार्य असल्यास डोके रुमालाने किंवा टोपीने झाकून ठेवा.

शरीराची हवा खेळती राहील असे सुती आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा.

चक्कर येणे, मळमळणे, तीव्र डोकेदुखी किंवा ताप जाणवल्यास त्वरित जवळच्या सरकारी रुग्णालयात संपर्क साधा.

Follow Us