कुणाची बॉडी रस्त्यावर सापडली तर कुणाची ऑटोमध्ये, राज्यात महिनाभरात उष्माघाताचे 8 बळी? लहान बाळाचाही समावेश

महाराष्ट्रामध्ये तीव्र उष्माघातामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या एका महिन्यात तब्बल ९ जणांचा बळी गेला आहे, ज्यात एका लहान बाळाचाही समावेश आहे. रस्त्यावर, ऑटोमध्ये किंवा शेतात काम करताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला. उष्माघातामुळे शरीरावर होणारे गंभीर परिणाम पाहता नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कुणाची बॉडी रस्त्यावर सापडली तर कुणाची ऑटोमध्ये, राज्यात महिनाभरात उष्माघाताचे 8 बळी? लहान बाळाचाही समावेश
राज्यात उष्माघाताने बळी
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Apr 27, 2026 | 1:22 PM

राज्यात गेल्या दोन महिन्यापासून उन्हाचा कडाका जाणवत आहे. भर दुपारी तर अनेकजण उन्हाने होरपळून निघत आहेत. घसा कोरडा पडत असून अनेकजण चक्कर येऊन पडताना दिसत आहेत. राज्यात गेल्या महिनाभरात उष्माघाताचे 8 बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कुणाचा मृतदेह रस्त्याच्याकडेला सापडला, कुणाची डेडबॉडी ऑटोत तर कुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. उष्माघाताने बळी गेलेल्यांमध्ये एका बाळाचाही समावेश आहे.

लातूरमध्ये युवक दगावला

लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात असलेल्या एरंडी या ठिकाणी उष्माघाताने काल एका युवकाचा मृत्यू झाला आहे. शेतात काम करून घरी परतल्यानंतर महेश इंगोले हा युवक चक्कर येऊन कोसळला. त्याला दवाखान्यात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. उष्माघातामुळेच महेशचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

शेतात काम करतानाच कोसळले

लातूर जिल्ह्यात उष्णता दिवसेंदिवस वाढत आहे. निलंगा तालुक्याच्या औराद शाहजानी परिसरात तीव्र उष्णता सातत्याने वाढत असून याच तीव्र उष्णतेने एका शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. 26 एप्रिल रोजी या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. 60 वर्षीय लक्ष्मण दादाराव भंडारे शेतात काम करत असताना अचानक कोसळले आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

नाशिकहून भावाकडे आला आणि…

परभणीत 25 एप्रिल रोजी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नाशिकहून परभणीत भावाकडे आलेल्या 37 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला. परभणीच्या नांदखेडा रोड भागातील ही घटना आहे. शिवाजी बबन कांबळे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेनंतर भावाच्या फिर्यादीवरू नानलपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उष्माघाताने बाळाचा मृत्यू

लातूर जिल्ह्यातल्या गोंद्री इथं 25 एप्रिल रोजी उष्माघाताने नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. उष्माघाताने मृत्यू झाल्याची ही जिल्ह्यातली दुसरी घटना आहे. औराद शहाजनी इथंही उष्माघाताने वृद्ध शेतकरी लक्ष्मण भंडारे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. शिया गोरे असं गोंद्री गावात उष्माघाताने मृत्यू पावलेल्या बाळाचे नाव आहे. कडाक्याचे ऊन आणि उष्ण हवामान याचा थेट परिणाम शरीरावर होत आहे.

शिक्षिकेचा मृत्यू

अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी गेला आहे. 23 एप्रिल रोजी गारगुंडी येथील प्राथमिक शिक्षिका उषा फापाळे (वय 50 ) यांचे निधन झाले. प्रखर उन्हात प्रवास केल्यानंतर फापाळे यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा वाटेत मृत्यू झाला. फापाळे यांची प्रकृती उष्माघातामुळेच खालावल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ढवळपुरी पाठोपाठ तालुक्यातील ही दुसरी घटना आहे.

रस्त्यावरच आढळला मृतदेह

अमरावतीत जिल्हा परिषदच्या प्रवेशद्वाराजवळ 19 एप्रिल रोजी एक मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटली आहे. 65 वर्षाच्या या व्यक्तीचं नाव किशोर वासनिक असून त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. 19 एप्रिल रोजी अमरावतीचं तापमान 44 अंशाच्या पार गेलं होतं. उन्हाचा फटका बसल्याने या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असं सांगितलं जातं. या रस्त्यावर वाहनाची वर्दळ असताना हा मृतदेह दिसून आला होता.

बसस्थानक परिसरात डेडबॉडी

15 एप्रिल रोजी हिंगोली बस्थानक परिसरात 30 वर्षीय व्यक्तीचा मृत देह आढळला. या 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे. 15 एप्रिल रोजी हिंगोली जिल्ह्याचे तापमान 40 डिग्री सेल्सिअस इतके होते. त्याचाच फटका या व्यक्तीला बसला असावा असं सांगितलं जात आहे.

मालवाहू ऑटोमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मालवाहू ऑटोमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. 15 एप्रिलची ही घटना आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेहाच्या अंगावर कुठल्याही मारहाणीच्या जखमा नव्हत्या. कदाचित या व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Follow Us