महाराष्ट्राचे सर्व बडे नेते आज दिल्ली दरबारी, अमित शाहांची भेट घेणार, नेमकं काय घडणार?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व सी. आर. पाटील यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत कांदा, पाणी आणि एसटीच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. या तीन नेत्यांच्या उपस्थितीत आज दिल्लीत दोन अत्यंत महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहेत. या दोन्ही बैठकांमध्ये महाराष्ट्रातील प्रलंबित शेती, पाणी आणि वाहतुकीच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा केली जाणार आहे.
कोणती बैठक किती वाजता?
आजच्या या दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच महाराष्ट्र मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. यामध्ये मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे, राधाकृष्ण विखे पाटील आणि जयकुमार रावल यांचा समावेश आहे. यातील पहिली बैठक दुपारी २ वाजता होणार आहे. ही बैठक केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्यासोबत होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्रातील प्रमुख मंत्री उपस्थित राहून राज्याच्या सिंचन प्रकल्पांवर चर्चा करतील.
तर दुसरी बैठक संध्याकाळी ४ वाजता पार पडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत ही हायप्रोफाईल बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह महाराष्ट्रातून आलेले सर्वच मंत्री उपस्थित राहतील. दिल्लीतील या दोन्ही बैठकांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील जनतेशी आणि शेतकऱ्यांशी जोडलेल्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.
कांदा प्रश्नावर आज तोडगा निघणार?
महाराष्ट्रात सध्या कांद्याचा प्रश्न प्रचंड पेटला आहे. कांदा दराबाबत निर्माण झालेली परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या मागण्या यावर केंद्रीय स्तरावरून तोडगा काढण्यासाठी अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे. तसेच राज्यातील पाणी टंचाई, रखडलेले सिंचन प्रकल्प आणि दुष्काळी भागातील पाणी पुरवठा योजनांना गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांच्यासोबतच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राची लालपरी असलेल्या एसटी बसच्या संदर्भातील प्रलंबित मागण्या आणि आर्थिक प्रश्नांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी काळातील विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.