
राज्यातील विविध भागांमध्ये आज २ डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मात्र काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे मतदानाला उशीर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे, बदलापूर, बुलढाणा, वाशिम आणि नांदेडसह अनेक ठिकाणी मतदान करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या दहशतीमुळे मतदानाची गती मंदावलेली पाहायला मिळत आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव आणि शिरूर या बिबट्याच्या क्षेत्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. मात्र सकाळच्या वेळेत मतदानावर बिबट्याच्या दहशतीचा स्पष्ट परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. याठिकाणी उमेदवारांना प्रचारादरम्यान बिबट्याच्या दहशतीमुळे मर्यादा आल्या होत्या. काही ठिकाणी संध्याकाळी ६ नंतर ठिकाठिकाणी वाड्या-वस्तींवरती प्रचारासाठी जाता येत नव्हतं. आता मतदारांवर सुद्धा सकाळच्या सुमारास बिबट्याच्या दहशतीचा फटका बसताना पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर मतदारांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्या क्षेत्रात मतदारांना भीती वाटू नये, यासाठी पोलिसांनी सेक्टर पेट्रोलिंग सुरू ठेवले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी निर्भयपणे बाहेर पडून मतदान करावे, यासाठी भीतीचे वातावरण कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.
बदलापुरात भाजप आणि शिवसेनेत राडा
बदलापुरात मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. बदलापूर पश्चिम येथील गांधी नगर टेकडी एसटी बसस्टँडजवळ भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. बस स्टँड परिसरात मतदारांना स्लिप वाटणे. आपले बूथ लावण्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेमुळे परिसरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांनी तातडीने मोठा फौजफाटा तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
यासोबतच राज्याच्या इतर भागात मतदानादरम्यान तांत्रिक अडचणी आणि गैरप्रकारांच्या घटना घडल्या. बुलढाण्यातील शासकीय तांत्रिक विद्यालय मतदान केंद्रावर एका युवकाला बोगस मतदान करताना पकडण्यात आले. संतापलेल्या मतदान प्रतिनिधींनी युवकाला चांगलाच चोप दिला. परंतु तो पळून जाण्यात यशस्वी झाला. बोगस मतदानामुळे केंद्रावर मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता.
वाशिमच्या मंगरूळपीर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग ८ मधील बुथ क्रमांक ३ वरची ईव्हीएम मशीन सकाळी ९ वाजता सुमारे दहा मिनिटे बंद पडली. तांत्रिक बिघाडामुळे मशीन बदलण्यात आली. पण बदलून आणलेली नवीन मशीनही काही वेळातच बंद पडल्याने मतदान प्रक्रियेला वारंवार ब्रेक लागल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे मतदारांना बराच वेळ रांगेत थांबावे लागले.
नांदेडच्या मुदखेड नगरपालिका मतदान प्रक्रियेदरम्यान बॅलेट युनिटमध्ये बिघाड झाला. मतदानाचे बटन दाबल्यानंतर ते पुन्हा वर येत नसल्याने अखेरीस बॅलेट युनिट बदलावे लागले. प्रभाग क्रमांक १ आणि ६ मध्ये या बिघाडामुळे १५ ते २० मिनिटे मतदान थांबले होते. मात्र, नांदेड जिल्ह्यातील इतर १० नगरपालिकेतील मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. वर्धामध्ये एका मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्याने गप्पांमध्ये गुंग असल्यामुळे मतदाराच्या बोटाला शाई लावली नसल्याचा आरोप मतदाराने केला. विजय उपशाम नावाच्या मतदाराने मतदान केल्यावर हा प्रकार लक्षात आला. चूक लक्षात आल्यावर त्याला पुन्हा बोलावून नंतर शाई लावण्यात आली.