अखेर बंडोबा झाले थंडोबा… कुठे कुठे माघार? तुमच्या जिल्ह्यातले चित्र काय? वाचा ग्राऊंड रिपोर्ट

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस आहे. बंडखोर उमेदवारांना शांत करण्यासाठी पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काही जिल्ह्यांमध्ये बंडखोरांनी अर्ज मागे घेतले आहेत, तर काही ठिकाणी अद्यापही पेच कायम आहे.

अखेर बंडोबा झाले थंडोबा... कुठे कुठे माघार? तुमच्या जिल्ह्यातले चित्र काय? वाचा ग्राऊंड रिपोर्ट
| Updated on: Jun 04, 2026 | 12:01 PM

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी राज्यात निवडणूक होत आहे. या निवडणुकीतील अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दुपारी 3 नंतर निवडणुकीच्या मैदानात कोण राहणार आणि कोण नाही? याचं चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत बंडखोरीही झाली आहे. त्यामुळे या बंडखोरांना समजावण्याचे कालपासूनच प्रयत्न सुरू आहे. काही बंडखोरांनी अर्ज मागे घेण्याचं मान्यही केलं आहे. तर काहींनी फोन बंद ठेवून माघार न घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सर्व पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. खासकरून या निवडणुकीत पारडं जड असलेल्या महायुतीची डोकेदुखी बंडखोरांनी वाढवली आहे. राज्यात कुठे कुठे बंडखोरांना शांत करण्यात पक्षांना यश आलं, त्याचाच हा ग्राऊंड रिपोर्ट.

नांदेडमध्ये काँग्रेसला दिलासा

नांदेडमध्ये माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. काँग्रेसकडून जवळगावकर आणि रामदास पाटील सुमठाणकर यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण सुमठाणकर यांची उमेदवारी कायम आहे. पक्षाने आदेश दिल्याने उमेदवारी मागे घेतल्याची जवळगावकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काम करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

सांगली-साताऱ्यात सेनेच्या बंडखोराची माघार?

सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीतून शिवसेना शिंदे गटाचे नेते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील उमेदवारी अर्ज माघार घेणार असल्याची शक्यता आहे. आज दुपारी 3 पर्यंत ते आपला अर्जं माघार घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर काँग्रेसचे बंडखोर पक्षाकडून आदेश आल्यावरच उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अभयसिंह जगताप की बाळासाहेब पाटील माघार घेणार? यावर खलबते सुरू आहेत. त्यामुळे दुपारी 3 नंतर कोणाची माघार होणार? हे समोर येणार असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

जळगावात मनधरणी

जळगावमध्ये देखील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जळगावमध्ये देखील शिवसेना शिंदे गटाच्या दोघांनी तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तीन जणांनी अपक्ष उमेदवारी अर्ज करत बंडखोरी केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार रेश्मा काळे जिल्हाप्रमुख तसेच पदाधिकाऱ्यांना सोबत घेत सहलीला रवाना झालेले आहेत. नाशिक सोडून मंत्री गिरीश महाजन तातडीने आता जळगावमध्ये दाखल झाले आहेत. जळगावमध्ये अपक्षांच्या मनधरणीसाठी तसेच बंडखोरी मागे घेण्यासाठी गिरीश महाजन चांगले तातडीने जळगावकडे निघालेले आहेत.

मविआच्या अधिकृत उमेदवाराची माघारी

यवतमाळ विधान परिषद निवडणूकीत मविआचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू झाली आहे. बाळासाहेब मांगुळकर, राहुल ठाकरे, जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांच्यासह मविआचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत. अपक्ष उमेदवार फारूक सय्यद यांना पुरस्कृत उमेदवार करण्यासाठी बैठक सुरू आहे. निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, अशी मविआची भूमिका आहे.

ठाण्यात बिनविरोध

दुसरीकडे ठाण्यातील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. शिंदे गटाच्या रवींद्र फाटकांविरोधातील ते एकमेव उमेदवार होते. अभिजीत पवार यांनी वैयक्तिक कारणाने अर्ज मागे घेतल्याने रवींद्र फाटक यांची निवड बिनविरोध झाल्याचे मानले जात आहे. मात्र, त्याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

उमेदवार नॉट रिचेबल

अहिल्यानगर विधान परिषदेत मोठा ट्विस्ट आला आहे. अपक्ष उमेदवार करण ससाणे नॉट रिचेबल झाले आहेत. करण ससाणे हे श्रीरामपूर पालिकेत काँग्रेसचे विद्यमान नगराध्यक्ष आहेत. महाविकास आघाडीचे एकमत न झाल्याने करण ससाणे हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. भाजपकडून प्राजक्त तनपुरे, अपक्ष करण ससाणे, अपक्ष दत्ता पानसरे, मच्छिंद्र धुमाळ आणि कमलेश गांधी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, करण ससाणे सकाळपासून नॉट रिचेबल असल्याने चुरस वाढली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us