
राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. या महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असताना विविध जिल्ह्यांतून गोंधळ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे विविध ठिकाणी आरोप-प्रत्यारोप आणि कारवाईच्या बातम्या समोर येत आहेत. पुण्यात ईव्हीएममधील तांत्रिक त्रुटी आणि पक्षांतर्गत बंडखोरीने नाट्यमय वळण घेतले आहे. तर मुंबई आणि नालासोपाऱ्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुण्यातील प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासमोर विचित्र पेच निर्माण झाला आहे. या प्रभागात घड्याळ चिन्हाचे चार उमेदवार असताना तुतारी चिन्हावर दोन बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दिलीप शंकर अरुंदेकर आणि अक्षदा प्रेमराज गदादे या दोन उमेदवारांना शरद पवार गटाने अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यांनी उमेदवारी कायम ठेवली. धक्कादायक बाब म्हणजे, पक्षाची अधिकृत उमेदवारी नसतानाही या उमेदवारांनी आपल्या प्रचारात ज्येष्ठ नेत्यांच्या फोटोंचा वापर केल्याचा दावा ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी केला आहे. या अनधिकृत वापरा विरोधात अंकुश काकडे यांनी न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
तर दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी ईव्हीएमविरोधात आक्षेप नोंदवला आहे. अंकुश काकडे हे नुकतंच मतदानासाठी एका मतदान केंद्रावर गेले होते. मात्र त्यांनी तिथे असलेल्या मतदान यंत्राबाबत (EVM) गंभीर तक्रार दाखल आली आहे. मी चौथ्या क्रमांकाचे बटण दाबले, पण त्यावरील लाईट लागली नाही, असा दावा अंकुश काकडेंनी केला आहे. मी बटण दाबल्यानंतर त्यावरील लाईट लागली नाही. तुम्ही तिथे बसलेले आहात. मी इथे आहे. मी चौथं बटण दाबल्यानंतर लाईट लागलेला नाही. माझी तक्रार नोंदवून घ्या, असे अंकुश काकडे म्हणाले. याबद्दल त्यांनी तेथील निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जोपर्यंत तक्रार नोंदवली जात नाही, तोपर्यंत मी हलणार नाही, असा आक्रमक पावित्रा अंकुश काकडे यांनी घेतला होता.
मुंबईतील चेंबूर (प्रभाग १५३) मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मोठा तणाव पाहायला मिळाला. शिवसेना (UBT) कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला बोगस आयडी कार्डसह मतदान केंद्राच्या परिसरात फिरताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणामुळे स्थानिक आमदार तुकाराम काते आणि ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. रविंद्र महाडीक नावाच्या संशयित इसमाला गोवंडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा व्यक्ती मध्यरात्री १:३० च्या सुमारास बीएमसी शाळेतील पोलिंग बूथमध्ये का शिरला होता? याचा तपास निवडणूक निर्णय अधिकारी (RO) आणि पोलीस करत आहेत.
धुळे शहरात निवडणूक प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. शिवसेना महानगरप्रमुख संजय वाल्हे यांनी प्रशासनावर सडकून टीका केली. अनेक मतदान केंद्रे मतदारांच्या राहत्या घरापासून लांब ठेवण्यात आली आहे. शेवटच्या क्षणी केंद्रांच्या ठिकाणी बदल केल्याचा आरोप वाल्हे यांनी केला आहे. यामुळे अनेक मतदारांना आपले केंद्र शोधताना अडचणी येत असून मतदानाच्या टक्केवारीवर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पूर्व पेल्हार फाटा येथे मध्यरात्री एका कारमधून २९ दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी संशयास्पद वाटणारी ही गाडी थांबवून त्याची तपासणी केली असता हा साठा सापडला. मतदारांना मतदानासाठी दारूचे आमिष दाखवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पेल्हार पोलिसांनी गाडीसह दारू जप्त केली असून ही रसद कोणासाठी पाठवली होती, याचा तपास सुरू आहे.