सचिन तेंडुलकरने बजावला मतदानाचा हक्क, मतदानानंतर जे बोलला त्याला तोड नाही…
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पत्नी अंजलीसह वांद्रे येथे मतदानाचा हक्क बजावला. उद्या १६ जानेवारी रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातील एकूण २९ महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आज संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. आज महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी मतदान पार पडत असून अनेक दिग्गजांनी आतापर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आज मुंबईत सहकुटुंबाचा मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सचिन तेंडुलकरने नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे. क्रिकेटमध्ये ज्याप्रकारे प्रत्येक धाव महत्त्वाची असते, तशाच प्रकारे लोकशाहीत प्रत्येक थेंबासारखा तुमचा प्रत्येक व्होट महत्त्वाचा आहे, अशा शब्दात सचिन तेंडुलकरने आज नागरिकांना मतदानाचे आवाहन केले.
घरात बसून चालणार नाही
सचिन तेंडुलकरने आज सकाळीच वांद्रे येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी अंजली तेंडुलकर देखील उपस्थित होत्या. “लोकशाहीने आपल्याला ही एकच संधी दिली आहे जिथे आपण आपले मत मांडू शकतो. आपल्याला शहराचा जो निकाल अपेक्षित असतो, त्यासाठी घरात बसून चालणार नाही, तर केंद्रावर येऊन बटण दाबावे लागेल. हीच ती वेळ आहे.” असे सचिन तेंडुलकर म्हणाला.
मी मतदान करायला आलोय कारण मला असं वाटतं की प्रत्येकाचे मत आणि प्रत्येकाचे वोट याचा खूप मोठा फरक पडतो. त्यामुळेच मी मतदान करायला आलोय. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की या आणि मतदान करा. कारण आपली जी मतं आहेत, ती इथे येऊन मांडायची ही एक वेळ आहे. त्यामुळे तुम्ही याचा वापर करावा. प्रत्येक मत मॅटर करतं. म्हणून मी विनंती करतो की येऊन मतदान करा. आपला विचार इथे येऊन मांडा, हीच वेळ आहे. मतदानाचा नीट वापर करा. ही अशी संधी असते जिथे तुमचे जे ओपनियन असते, ते तुम्ही मतदानातून सांगू शकता. प्रत्येक थेंब महत्त्वाचा असतो, तसंच प्रत्येक मत महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्हाला जो निकाल अपेक्षित असतो, त्यासाठी तुम्हाला मतदान करणं गरजेचं आहे, असे सचिन तेंडुलकर यांनी सांगितले.
सार्वजनिक सुट्टी जाहीर
दरम्यान आज १५ जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाची निवडणूक होत आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्य निवडणूक आयोगाने एकाच टप्प्यात २९ महानगरपालिकांसाठी मतदान जाहीर केले आहे. मुंबई (BMC), पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांतील पालिकेसाठी ही निवडणूक पार पडत आहे. या २९ महापालिका क्षेत्रांत मिळून सुमारे ३.४८ कोटी मतदार आहेत. तर एकूण २,८५९ नगरसेवक पदांसाठी हजारो उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी राज्य सरकारने या सर्व निवडणूक क्षेत्रांत आज सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. आज पार पडलेल्या या हाय-व्होल्टेज निवडणुकीची मतमोजणी उद्या १६ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.