कडाक्याच्या थंडीत गाडीमध्ये..; Live शोमध्ये हनी सिंहने ओलांडल्या सर्व मर्यादा, नेटकऱ्यांचा चढला पारा
दिल्ली इथल्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये प्रसिद्ध गायक आणि रॅपर हनी सिंहने आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे नेटकरी त्याच्यावर भडकले आहेत. हा संपूर्ण नशेचा परिणाम असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे.

प्रसिद्ध गायक आणि रॅपर हनी सिंह आणि वाद हे जणू समीकरणच बनलं आहे. हनी सिंहच्या वादाचा फार जुना इतिहास आहे. अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे त्याला टीकेचा सामना करावा लागला आहे. आता पुन्हा एकदा दिल्लीतल्या कॉन्सर्टमध्ये असं काही म्हणाला, ज्यावरून तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हनी सिंह स्टेजवरून प्रेक्षकांशी बोलताना दिल्लीची थंडी आणि इंटिमसी यांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी करताना दिसत आहे. ही क्लिप समोर येताच नेटकऱ्यांनी त्याच्यावर प्रचंड राग व्यक्त केला. हे कृत्य अशोभनीय, अश्लील असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर हा ड्रग्जचा परिणाम असल्याचा टोलाही काहींनी लगावला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
व्हायरल व्हिडीओमध्ये हनी सिंह अचानक कॉन्सर्टदरम्यान एक वक्तव्य करतो, जे अनेक प्रेक्षकांना आक्षेपार्ह वाटलं. दिल्लीतील थंड हवामानाचा संदर्भ देत हनी सिंह म्हणतो की अशा वातावरणात इंटिमेट व्हायला आवडतं. (इथे आम्ही त्याचं वक्तव्य अत्यंत सभ्य आणि सौम्य शब्दांत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.) त्याच्या वक्तव्यावरून उपस्थित प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकतो. काहीजण टाळ्या वाजवतात तर काही जण हूटिंगसुद्धा करतात. परंतु जेव्हा सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर आला, तेव्हा नेटकऱ्यांची प्रतिक्रिया पूर्णपणे वेगळी होती. एका सेलिब्रिटीने अशा पद्धतीची भाषा आणि तेसुद्धा इतक्या मोठ्या मंचावर वापरणं अस्वीकार्य आणि चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.
View this post on Instagram
‘मंचावर कलाकाराने एक मर्यादा पाळायची असते, हनी सिंहने त्या मर्यादेचं सर्रास उल्लंघन केलं आहे’, असं एकाने लिहिलंय. तर ‘हे सर्व त्याने नशेत म्हटलंय का’, असा सवाल दुसऱ्याने केला आहे. ‘तरुणांवर अशा वक्तव्यांचा चुकीचा परिणाम होतो. कलाकारांना त्यांची जबाबदारी समजायला हवी’ असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. अनेकांनी हनी सिंहच्या व्यसनावरून प्रश्न उपस्थित केला आहे. हनी सिंह दावा करतो की त्याने नशा सोडली आहे, परंतु ही घटना पाहून त्यावर विश्वास बसत नाही, अशी कमेंट एका युजरने केली आहे.
हनी सिंह अशा पद्धतीने त्याच्या वक्तव्यांमुळे किंवा गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्याच्या करिअरमध्ये आजवर त्याला अनेकदा गाण्यावरून आणि वक्तव्यांवरून टीकेचा सामना करावा लागला आहे. हनी त्याच्या नशेच्या सवयीमुळे आयसोलेशनमध्येही गेला आहे. वेळेनुसार त्याने त्याची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला. मानसिक स्वास्थ्याशी संबंधित समस्यांवर तो मोकळेपणे व्यक्त झाला. परंतु दिल्लीतील त्याच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा त्याच्या सर्व गोष्टींवर प्रश्न उपस्थित करण्यास भाग पाडलं आहे.