
सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने २९ महापालिका निवडणुकांची घोषणा केली आहे. येत्या १५ जानेवारीला महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. तर १६ जानेवारीला या निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाईल. याच पार्श्वभूमीवर सध्या राज्यात राजकीय भेटीगाठी, युती-आघाडी, जागावाटप आणि पक्षांतरच्या घटना वेगाने घडत आहेत. त्यातच आता गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा असलेल्या मनसे-शिवसेना युतीबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रात महापालिका निवडणुका जाहीर होताच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यामुळे या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. या भेटीमागचे अधिकृत कारण मतदार यादीतील घोळाविरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काढलेल्या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात असल्याचे बोललं जात आहे. मात्र या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच या भेटीमुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संभाव्य युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
आता या भेटीनंतर, ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यासाठीची तारीखही लवकरच जाहीर होईल, असे बोलले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि मनसे ही संभाव्य युती झाल्यास मुंबईसह राज्यातील अनेक समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता याबद्दल ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी भाष्य केले.
मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची अधिकृत घोषणा कधी करायची याचा निर्णय दोन्हीही पक्षाचे नेते घेतील. ती तारीख आपल्याला लवकरच कळवली जाईल. सर्व गोष्टी चर्चेत आहेत. चर्चेअंती जेव्हा शेवटचा निर्णय होईल, तेव्हा पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला कळवलं जाईल. काँग्रेसबद्दल काहीही सांगू इच्छित नाही. एकदा याला अंतिम स्वरुप आलं की कळवू. युतीची घोषणा, कोणाबरोबर काय चर्चा, या सर्वाचा जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत चर्चा सांगितल्या जात नाही. अंतिम निर्णय सांगितले जातात, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली.
तसेच निवडणूक आयोगाबद्दल आम्ही लवकरच स्वतंत्र पत्रकार परिषद घेणार आहे. युतीचा निर्णय दोन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन आपल्याला कळवतील. जेव्हा निर्णय अंतिम होतील तेव्हा आम्ही कळवू, असेही अनिल परब म्हणाले.