
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे. या मतदानाची तारीख जवळ येत असतानाच आता राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता छुप्या पद्धतीने पैसे वाटप होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये पैसे वाटपाच्या संशयावरून मुंबई, वसई आणि डोंबिवलीत राजकीय पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या संघर्षाचे रूपांतर हाणामारी आणि थेट हत्येच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये झाले आहे.
डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक २९ मध्ये सर्वात गंभीर परिस्थिती पाहायला मिळत आहे. डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मैत्रीपूर्ण लढत सुरु असतानाच पैसे वाटपाच्या आरोपावरून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. ज्यामध्ये ४ कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत.
भाजप उमेदवाराचे पती सोमनाथ नाटेकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिवसेनेच्या दोन उमेदवारांसह पाच जणांवर कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला. रात्री उशिरा पोलिसांनी रुग्णालयात उपचार घेत असलेले शिवसेना उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी संताप व्यक्त केला आहे. ही प्रशासकीय दडपशाही असल्याचे म्हटले आहे. तर माझ्या पतीच्या जिवाला काही झाले तर प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा नितीन पाटील यांच्या पत्नी रंजना पाटील यांनी दिला आहे. सध्या डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जळगावच्या ममुराबाद नाका परिसरात निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने (SST) नाकेबंदी दरम्यान एका कारची झडती घेतली. या कारमध्ये तब्बल २९ लाख रुपयांची रोकड, ३ किलो चांदी आणि ८ तोळे सोने आढळून आले. कारमधील व्यक्तींनी हा मुद्देमाल बहऱ्हाणपूर येथील सराफ पेढीचे मालक दामोदरदास गोपालदास श्रॉफ यांचा असल्याचे सांगितले. मात्र, जागेवर कोणतीही अधिकृत कागदपत्रे किंवा पावत्या सादर न केल्यामुळे पोलिसांनी हा सर्व ऐवज जप्त करून सरकारी कोषागार विभागात जमा केला आहे.
वसई पूर्व वॉर्ड क्रमांक १९ मधील वसई फाटा आणि गांगडी पाडा परिसरात मध्यरात्री दोनच्या सुमारास हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. बहुजन विकास आघाडी (बविआ) आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजप-शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांना पिशव्यांसह पकडल्याचा दावा केला. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कार्यकर्त्यांनी पोलिसांशीही हुज्जत घातली. मात्र, पेल्हार पोलिसांनी या प्रकरणी रात्रीच्या वेळी कोणतीही रोकड हस्तगत झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबईतील बोरीवली पूर्व वॉर्ड क्रमांक १४ मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटल्याचा आरोप केला. काल रात्री उशिरा मनसे कार्यकर्त्यांनी या विरोधात गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या तक्रारीची दखल घेत पोलिस आता सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत.