
मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 15-16 दिवसांतच मतदान आणि मतमोजणी होऊन अंतिम निकाल हाती लागेल. राज्यातील महानगरपालिकांत सत्तेसाठी रस्सीखेच सुरू असून कोणाचा विजय होता याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काल शेवटचा दिवस होता. आज कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. मात्र या निवडणुकीत बऱ्याच जणांना तिकीट मिळालं असलं तरी युत्या -आघाड्यात अनेक पक्षांच्या जागा एकमेकांना गेल्याने अनेक उमेदवारांच्या मनसुब्यांवर पाणी फिरलं. तिकीटं न मिळाल्याने काल राज्यात ठिकठिकाणी गोंधळ, रडारड सुरू असल्याचे चित्र दिसत होते. निवडणूक लढवण्याची इच्छा असूनही तिकीट न मिळाल्याने काहींनी तर थेट पक्षांतराचाच मार्ग निवडला. यामुळे राज्यभरात काल गोंधळाचं वातावरण दिसून आलं.
उमेदवारी मिळाली नाही म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांचं आंदोलन
भारतीय जनता पक्षकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून छत्रपती संभाजीनगर येथेदोन महिला पदाधिकाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. दिव्या मराठे आणि वर्षा साळुंके या दोन महिला कालपासूनच आंदोलन करत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून या दोघी भाजपचे काम करत आहेत. मात्र त्यांना कालपर्यंत उमेदवारी अर्ज देण्यात आला नाही. त्यांचं तिकीटचं कापण्यात आलं. ज्या ठिकाणी आम्हाला डावलून इतरांना उमेदवारी दिली आहे, त्या लोकांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी या महिलांनी केली असून त्यासाठीच त्यांचं उपोषण सुरू आहे.
नागपुरात उमेदवाराला थेट स्मशान घाटावर दिला एबी फॉर्म
दरम्यान काल एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले, तेव्हा नागपूरमध्ये एक वेगळाच प्रकार घडल्याचे समोर आले. नागपुरात शिंदेसेनेच्या उमेदवाराला थेट स्मशान घाटावर एबी फॉर्म देण्यात आल्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून शिवसेना (शिंदे गट) कडून योगेश गोन्नाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच प्रभाग क्रमांक 8 मधून योगेश गोन्नाडे यांची मुलगी कृतिका गोन्नाडे हिलाही शिंदेसेनेने उमेदवारी दिली आहे. काल योगेश गोन्नाडे यांच्या आईचे निधन झाले. आज नागपुरातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत काल दुपारी ३ वाजेपर्यंत असल्याने शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी थेट स्मशान घाट गाठत योगेश गोन्नाडे आणि कृतिका गोन्नाडे यांना एबी फॉर्म सुपूर्त केला. एकीकडे आईच्या जाण्याचे दुःख तर दुसरीकडे अपेक्षा सोडल्यावर मिळालेली उमेदवारी अशा दुहेरी भावनिक स्थितीत योगेशने गोन्नाडे यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला. शहरात ही घटना अतिशय चर्चेचा विषय ठरली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दिव्या मराठे यांचे उपोषण
छत्रपती संभाजीनगर येथे भाजपाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात दिव्या मराठे यांनी उपोषण केलं. प्रभाग क्रमांक 20 मधून उमेदवारी नाकारल्याने दिव्या मराठे उपोषणाला बसल्या . माझं काम असूनही तिकीट दिलं नाही, एका महिला उमेदवाराला किचनमध्ये जाऊन तिकीट दिलं असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या 18 वर्षांपासून भाजपाच्या कार्यकर्त्या असलेल्या दिव्या मराठे या अतुल सावे व भागवत कराड यांच्यावर नाराज आहेत. मला स्वीकृत नगरसेवक पद देणार असं बॉण्डवर लिहून दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.