
आजपासून महाराष्ट्रात शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. आदिशक्तीच्या विविध रूपांची पूजा करण्यासाठी राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. मुंबई, पुणे, धाराशिव, नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. यानिमित्ताने भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
पुण्यात ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरासह शहरातील इतर मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने घटस्थापना झाली. यानिमित्ताने मंदिरांना आकर्षक रंगरंगोटी, फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण शहर उत्सवमय झाले आहे. यंदा तिथीची वृद्धी झाल्यामुळे नवरात्र दहा दिवसांचे आहे. येत्या २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात साजरे होणार आहे. पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे साडेचार ते दुपारी दोनपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त आहे.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्री दुर्गामाता दौडीलाही सुरुवात झाली. गेल्या ४१ वर्षांपासून संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली ही दौड काढण्याची परंपरा कायम आहे. यावर्षी दौडीची सुरुवात पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून करण्यात आली. पुणे पोलिसांनी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. गुन्हेगारी टोळ्यांना आळा घालण्यासाठी परिमंडळ १ मधील ४३ जणांना एकाच दिवशी तुरुंगात पाठवण्यात आले आहे. यामध्ये हत्यार कायद्यातील आरोपी, दारूबंदीचे गुन्हेगार आणि इतर गंभीर गुन्हेगारांचा समावेश आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला धाराशिवमध्ये आजपासून प्रारंभ झाला. नवरात्र महोत्सवापूर्वीची मंचकी निद्रा संपवून देवी पहाटे सव्वादोन वाजता वाजतगाजत सिंहासनावर विराजमान झाली. दुपारी १२ वाजता मंदिर संस्थांचे अध्यक्ष तसेच जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते सिंहासन गाभाऱ्यामध्ये घटस्थापना करण्यात आली. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या विविध पूजा मांडण्यात येणार आहेत. त्यापैकी भवानी तलवार अलंकार महापूजा भाविकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र असते. नवरात्रीमध्ये देशभरातील ५० लाख भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येण्याचा अंदाज मंदिर संस्थांनी व्यक्त केला आहे.
माहूरगड येथे रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. राज्यासह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक रेणुका मातेच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. नऊ दिवस गडावर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यामध्ये देवीचा अभिषेक, वस्त्र आणि अलंकारांचे प्रदान, घटस्थापना, महाआरती आणि कुमारीका पूजन सोहळ्यांचा समावेश आहे.
नाशिकमधील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी देवीच्या गडावरही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. आज नवरात्रोत्सवाची पहिली माळ असल्याने राज्यभरातील भाविक मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी येत आहेत. कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सप्तशृंगी गडावर यात्रा उत्सव चालणार आहे.
मुंबईच्या मुंबादेवी मंदिरात आजपासून घटस्थापनेला नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. पहाटे ५:३० वाजता मंगल आरती करुन मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी ७ ते ८ वाजता घटस्थापना करण्यात आली. संपूर्ण नवरात्र काळात २१ विशेष पुजाऱ्यांमार्फत चंडीपाठ केला जाणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बॅग स्कॅनर, सीसीटीव्ही कॅमेरे आणि १५० स्वयंसेवकांचे पथक मदतीसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे.
तुळजाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने तरुण भवानी ज्योत नेण्यासाठी तुळजापुरात दाखल झाले. तुळजाभवानी मंदिरातील होमकुंडापासून प्रज्वलित केलेली ही ज्योत गावोगावीच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी नेली जाते. यानंतर पुढील नऊ दिवस ती अखंड तेवत ठेवली जाते.