Maharashtra News LIVE: जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत पाच जागा बिनविरोध
Maharashtra News LIVE: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आतापर्यंत पाच जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित जागा वाटपासाठी महायुतीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
पुणे शहरात गेल्या चार दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असून थंडीचा कडाका वाढला
पुणे शहरात गेल्या चार दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असून थंडीचा कडाका वाढताना पाहायला मिळत आहे. शहरातील किमान तापमान सध्या १६ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले जात आहे. रविवारी पुण्यातील तापमानाचा पारा थेट १२ अंशांपर्यंत घसरला होता. त्यामुळे पुणेकरांना हुडहुडी भरवणाऱ्या थंडीचा अनुभव येत आहे. विशेष म्हणजे, सकाळच्या वेळी थंडीचा जोर जाणवत असला तरी दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका वाढत आहे. तर रात्री पुन्हा गारठा जाणवत आहे. सकाळी थंडी, दुपारी कडक ऊन आणि रात्री पुन्हा थंडी असे संमिश्र वातावरण सध्या पुणे शहरात पाहायला मिळत आहे.
-
कल्याण-आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या फटका गँगची दहशत पुन्हा एकदा समोर
कल्याण-आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या फटका गँगची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रयागराज-अमृत भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या हातावर आंबिवली स्थानकाजवळ अज्ञात चोरट्यांनी दांडक्याने जोरदार वार केला. या हल्ल्यात प्रवाशाच्या हातातून १ लाख २२ हजार ७९६ रुपये किमतीचा आयफोन १६ प्रो मॅक्स खाली पडताच चोरट्यांनी मोबाईल घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी सुरुवातीला भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, घटनास्थळ कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने हा गुन्हा पुढील तपासासाठी कल्याण जीआरपीकडे वर्ग करण्यात आला आहे. धावत्या रेल्वेत प्रवाशांवर हल्ला करून मोबाईल लंपास करणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी कल्याण रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
-
-
जळगाव जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली
जळगाव जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे. एक जागा देऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी सर्व ठिकाणी माघारी घेण्याबाबतचा प्रस्ताव मांडला आहे. शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा मंत्री गिरीश महाजन यांना फोन आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. महायुतीच्या पाच बैठका होऊनही जागांचा तिढा कायम आहे. मुक्ताईनगर आणि चोपड्याच्या जागेवरून टशन सुरू आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, रक्षा खडसे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात आहेत.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी महापालिकेच्या वतीने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करणारी आकर्षक रांगोळी देखील काढण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंब सकाळी 11 वाजता बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी स्मृतिस्थळी येणार आहेत. तर दुसरीकडे अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिर परिसरात एफडीएकडून मोठी कारवाई झाली आहे. मंदिर परिसरातील दुकानातून 850 किलो मिठाई जप्त करण्यात आली आहे. सोलापूर अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाकडून अक्कलकोट इथल्या पेढा उत्पादक आणि विक्रेत्यांवर मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत अडीच लाख रुपयांचा साडे आठशे किलो पेढा जप्त करत 4 आस्थापनांना व्यवसाय बंदचे आदेश दिले आहेत. यासह इतर महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.