Maharashtra News LIVE : सर्वदूर पाऊस तरीही पेरण्या खोळंबल्या, शेतकरी चिंतेत..

दोन दिवस पावसाने विश्रांतीघेतल्यानंतर रात्रीपासून पुन्हा मुसळधार पावसाची सुरुवात झाली. मुंबई देखील अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. तर, पर्यटन नगरी लोणावळ्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलंय. दुसरीकडे, खासदार भाऊसाहेब वाकचौरेंच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.

Maharashtra News LIVE : सर्वदूर पाऊस तरीही पेरण्या खोळंबल्या, शेतकरी चिंतेत..
| Edited By: | Updated on: Jun 29, 2026 | 9:12 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 29 Jun 2026 09:20 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

    मुसळधार पावसामुळे शेतामध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, गावाला जोडणारा वाहतुकीचा मुख्य रस्ता पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात पूर्णपणे वाहून गेला आहे. रस्ता खचल्यामुळे परिसरातील वाहतूक ठप्प झाली असून ग्रामस्थांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

  • 29 Jun 2026 09:05 AM (IST)

    जालना जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू

    जालना जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघाताच्या घटनेत 3 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या.जालना अंबड महामार्गावर कार आणि ट्रकच्या धडकेमध्ये जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथील दोन जिवलग मित्रांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला,विकास चव्हाण आणि सागर बर्डे अशी मृत्यू झालेल्या दोन जिवलग मित्रांची नावे आहेत तर दुसरीकडे बदनापूर तालुक्यातल्या अकोला गावातील पोलीस भरतीची तयारी करणारा तरुण देवानंद गीते याचा देखील दुचाकीच्या धडकेत जागीच मृत्यू झालाय.

  • 29 Jun 2026 08:57 AM (IST)

    आज संत निवृत्तिनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

    आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वरात हजारो वारकरी-भाविकांची गर्दी जमली आहे.  सिंहस्थ कामांमुळे यंदा पालखीच्या पारंपरिक मार्गात बदल करण्यात आलेत,  पालखीसाठी आकर्षक रथ व मंदिराची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.  प्रशासनाकडून सुरक्षा, वाहतूक व सुविधांचे विशेष नियोजन करण्यात आलं आहे. मंत्री गिरीश महाजन, अमित ठाकरे पालखी सोहळ्याला लावणार हजेरी लावणार आहेत.

  • 29 Jun 2026 08:45 AM (IST)

    सोलापुरात काल रात्री झालेल्या पहिल्याच पावसात शहरातील अनेक घरात शिरले पाणी

    सोलापूर जिल्ह्यात काल रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे शहरातील नागरिकांच्या घरांमध्ये  गुडघाभर पाणी साचले.  रस्त्यावर आणि घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने अनेक नागरिकांनी रात्र  जागून काढली. शहरातील घरकुल, 256 गाळा परिसरातील अनेक नागरिकांच्या घरात  पाणी शिरले, पहिल्याच पावसात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने सोलापूरकरांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

  • 29 Jun 2026 08:35 AM (IST)

    केतन अग्रवाल हत्याकांडा मधील आरोपीची आज पोलीस कोठडी संपणार

    केतन हत्याकांडामधील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीला न्यायालयाने 8 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती ती आज संपणार आहे, आज दुपारच्या सत्रात मावळ तालुक्यातील वडगांव न्यायालयात ह्या दोघांना हजर करणार. काल सकाळच्या सुमारास लोणावळा पोलिसांनी लोहगडावर आरोपींना घेऊन जात क्राईम सीन रिक्रिएशन करण्यात आलं. त्यानंतर पोलीसानी दोनही आरोपीकडे कसून तपास करण्यात आला. ह्या प्रकरणात आतपर्यंत 10 ते 12 लोकांचे जवाब लोणावळा पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. या मध्ये प्रामुख्याने सिया गोयल चे आई-वडील,भाऊ तसेच गोयल आणि अग्रवाल यांचे नातेवाईक मित्तल यांची चौकशी करत महत्वाचे जबाब नोंदवून घेतले आहेत. या मधून अनेक खुलासे देखील समोर आले आहेत.

  • 29 Jun 2026 08:30 AM (IST)

    नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरातील गोडसे मळा परिसरात मादी बिबट्या जेरबंद

    संसारी गावातील गोडसे मळा परिसरात बिबट्याचा  वावर होता. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असल्याने आठ दिवसांपूर्वी  पिंजरा लावण्यात आला होता. वनविभागाने पिंजरा लावल्यानंतर चार वर्षाची मादी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याची नागरिकांनी माहिती दिल्यानंतर वनविभागाने रेस्क्यू केले.

  • 29 Jun 2026 08:25 AM (IST)

    त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील ऐतिहासिक अमृतकुंडाच्या तळाशी असलेले शिवलिंगांचे अनेक वर्षांनंतर प्रथमच झाले दर्शनास

    भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण कडून संवर्धनाच्या कामाअंतर्गत अमृतकुंडातील पाणी उपसून स्वच्छता करण्यात आली. स्वच्छतेदरम्यान कुंडाच्या तळाशी असलेले शिवलिंग स्पष्टपणे दिसून आले.  सुमारे ६५ फूट खोल असलेले अमृतकुंड पेशवेकालीन असल्याचे मानले जाते. याच कुंडातील पाण्याचा उपयोग श्री त्र्यंबकेश्वराच्या नित्यपूजा व अभिषेकासाठी केला जातो. सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांना अमृतकुंडात प्रवेशास परवानगी नाही. या दुर्मिळ दर्शनामुळे मंदिर प्रशासन आणि अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले गेले.

  • 29 Jun 2026 08:20 AM (IST)

    राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला नागपूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

    रविवारी जिल्ह्यात 3 लाख 24 हजार 322 बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस पाजण्यात आला. ग्रामीण भागात 98 टक्के तर नागपूर शहरात 93 टक्के लसीकरण करण्यात आले. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी 29 जून ते 3 जुलै दरम्यान आरोग्य पथके घरोघरी जाऊन डोस पाजणार आहेत.

  • 29 Jun 2026 08:18 AM (IST)

    जळगाव : शेतात पेरणी करत असताना विजेचा धक्का लागून बैलाचा मृत्यू

    जळगाव, भुसावळ : आज शेतात पेरणी करत असताना विजेचा धक्का लागून बैलाचा मृत्यू तर थोडक्यात पेरणी करणाऱ्या महिला बचावल्या आहेत.
    भुसावळच्या गोजोरे शिवारात ही घटना घडली आहे.  मात्र शेतकऱ्याचा बैल गेल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट येऊन या शेतकऱ्याची पेरणी खोळंबली आहे.

  • 29 Jun 2026 08:15 AM (IST)

    लातूर जिल्ह्यातल्या उदगीर मध्ये मोठा पाऊस

    लातूर जिल्ह्यातल्या उदगीर मध्ये मोठा पाऊस झाला आहे, या पावसाने शहरातल्या रस्त्यांवर सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे . उदगीरच्या नांदेडनाका भागात नालीचे पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने वाहतुकीला अडचण झाली आहे. वाहनांना रस्त्यावर आलेल्या पाण्यातून वाट काढत पुढे जावे लागते आहे. रस्त्याला तलावाचे स्वरूप आल्याने नागरिकांचीही अडचण झाली आहे.

  • 29 Jun 2026 08:10 AM (IST)

    KDMC महासभेत आज विविध प्रश्नांवर जोरदार चर्चा; नगरसेवकांकडून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता

    प्रभाग फेररचना, रिंगरोड प्रकल्प आणि शहरासाठी स्वतंत्र पार्किंग पॉलिसी हे विषय चर्चेच्या केंद्रस्थानी असणार आहेत. २७ गावांतील विकासकामे, आरोग्य सुविधा आणि मूलभूत नागरी प्रश्नांवर सभागृहात खडाजंगी होणार. सार्वजनिक उद्यानांची दुरावस्था, आचार्य अत्रे रंगमंदिराची अवस्था आणि रखडलेल्या कामांवर प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे. शहराच्या विकासाशी निगडित महत्त्वाच्या निर्णयांमुळे आजच्या महासभेकडे नागरिकांचे लक्ष लागले.

  • 29 Jun 2026 08:05 AM (IST)

    “लाखो प्रवाशांचे स्टेशन, पण सुविधा रामभरोसे; कल्याण स्टेशनवरील शौचालयाची दयनीय अवस्था”

    कल्याण रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील शौचालयाची दुरावस्था सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत  आहे. तुटलेले दरवाजे, साचलेली घाण आणि दुर्गंधीमुळे प्रवाशांचा तीव्र संताप होत आहे. महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना शौचालय वापरताना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. शौचालय परिसरातच काही व्यक्ती आंघोळ करत असल्याचे दृश्य व्हायरल होत आहे.  व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्ती व स्वच्छता मोहीम राबवण्याची प्रवाशांनी मागणी केली आहे.

अनेक ठिकाणी आता पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. पर्यटन नगरी लोणावळ्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलंय. गेल्या 24 तासांत तब्बल 131 मिलीमीटर पाऊस बरसलाय. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद झालीये. मात्र यंदा आत्तापर्यंत अवघे 393 मिलीमीटर इतकाच पाऊस झालाय. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत तब्बल 1885 मिलीमीटर इतका पावसाची नोंद झाली होती. तर नवी मुबंईत पावसाला सुरवात झाली आहे. APMC मार्केट परिसरात पाणी भरलं आहे. नवी मुबंईतील सखल भागात पाणी भरलं आहे. नवी मुबंईतील जुईनगर, वाशी, पनवेलमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. तर दुसरीकडे, राजकारणात तणावाचं वातावरण आहे. आज उद्धव ठाकरेंचा शिर्डी येथे कार्यकर्ता मेळावा आहे. खासदार भाऊसाहेब वाकचौरेंच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. ठाकरे वाकचौरेंचा कसा समाचार घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.

Follow Us