
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे सध्या शिर्डीत मुक्कामी आहेत. काल रात्री ते शिर्डीत दाखल झाले. यानंतर राज्यात राजकीय घडामोडी आणि प्रशासकीय बैठकांना वेग आला आहे. शिर्डी विमानतळावर दाखल झाल्यानंतर लगेचच अमित शाह यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासोबत बंद दाराआड महत्त्वाची चर्चा केली. साधारण पाऊण तास ही बैठक सुरु होती. यामुळे आता राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
शिर्डीतील हॉटेल सन ॲन्ड सँड येथे मुक्कामासाठी पोहोचताच, अमित शाह यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत तातडीने बैठक घेतली. ही बैठक खासगी स्वरुपात होती. या बैठकीत जवळपास पाऊण तास चर्चा करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीचा मुख्य अजेंडा राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान आणि त्यासाठी तातडीने द्यायची मदत हा असल्याचे बोललं जात आहे. तसेच याव्यतिरिक्त बैठकीत राज्यातील विविध विकासकामांचा आढावा आणि प्रशासकीय बाबींवरही चर्चा झाली. या बैठकीमुळे, शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक मदत लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी जोर धरत आहे. त्यातच आता अमित शाह यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल चर्चा केली. त्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मदतीची घोषणा करण्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमित शाह यांच्या दौऱ्याची सुरुवात आज रविवार सकाळी ११ वाजता श्री शिर्डी साईबाबांच्या दर्शनाने होणार आहे. यानंतर शाह लोणी आणि कोपरगाव येथील विविध कार्यक्रमांना हजेरी लावतील. लोणी प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्ण उंचीच्या पुतळ्याचे अनावरण शाह यांच्या हस्ते होईल. तसेच, येथील सहकारी साखर कारखान्याच्या नुतनीकरणाचा कार्यक्रम पार पडेल. या दोन्ही कार्यक्रमांनंतर शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. तसेच कोपरगाव येथे कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या CNG (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) प्रकल्पाचे उद्घाटन शाह यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर येथेही एका शेतकरी मेळाव्यात ते मार्गदर्शन करतील.
काल रात्री झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर अमित शाह आज लोणी आणि कोपरगाव येथील शेतकरी मेळाव्यांमध्ये भाषण करणार आहेत. या मेळाव्यांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ते काही मोठी घोषणा करतात का, याकडे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.