महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय तरी काय? पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्याला राष्ट्रवादीची उमेदवारी

एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी पत्नीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या युवा शहर अध्यक्षास राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली आहे. राष्ट्रवादीच्या या निर्णयानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय तरी काय? पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्याला राष्ट्रवादीची उमेदवारी
Vishal Kakade
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Nov 20, 2025 | 2:05 PM

काही दिवसांपूर्वी चिखली शहरातील एक धक्कादायक प्रकरण समोर आले होते. पतीचे बाहेर कुठे तरी अफेअर असल्याचा संशय एक पत्नीने व्यक्त केला. पण जेव्हा तिने पतीला जाब विचारला तेव्हा पतीने थेट तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणानंतर संपूर्ण चिखली शहरात खळबळ माजली होती. पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकणारा काँग्रेसचा युवा शहर अध्यक्ष आहे. आता त्याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे.

चिखली शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेल्या विशाल उर्फ रिकी काकडेवर पत्नी नमिता काकडेने 9 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली. त्यानंतर विशाल काकडेला अटक करण्यात आली. तो अद्याप न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र विशाल काकडेने न्यायालयाच्या परवानगीने नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 13 अ मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशाल काकडेने न्यायालयीन कोठडीत असताना पोलीस संरक्षणात येऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश

विशाल काकडेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याचा अर्ज नाकारण्यात आला. त्यामुळे विशाल काकडेने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे चिखली शहरात खळबळ माजली आहे. पत्नीला जाळणाऱ्या रिकी काकडे याने राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या विरुद्ध षडयंत्र रचले जात असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी केला आहे.

नेमकं काय घडलं होतं?

समोर आलेल्या माहितीनुसार, विशाल काकडे आणि नमिता काकडे यांचा 2020मध्ये विवाह झाला आहे. त्यांना दोन मुले आहेत. नमिता ही नगर परिषदेमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिला पतीवर संशय आहे. त्याचे इतर मुलींशी अफेअर असावे असे तिला वाटत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये सतत वाद सुरु होते. एकदा नमिताने विशालला याविषयी विचारले तर त्याचा राग टोकाला पोहोचला. त्याने पत्नीचा अंगावर पेट्रोल ओतरले. नंतर तिला पेटवण्याचा प्रयत्न केला. नमिताने प्रसंगावधान राखत पेट्रोलने भिजलेली साडी पाण्याने भिजवली. त्यामुळे तिचा जीव वाचला.