
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय होणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. येत्या १३ सप्टेंबरपासून महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबई, रायगड, रत्नागिरीसह ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर बंगालच्या उपसागरात शुक्रवारी सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील दोन दिवसांत ते पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे. याच स्थितीमुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि उत्तर कोकणात जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. येत्या शनिवारपासून सोमवारपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस कोसळेल, अशी शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाची जोर ओसरल्याने तापमानात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागत आहे. त्यातच शुक्रवारी मुंबईच्या कमाल तापमानात घट होऊन ते २९.७ अंश सेल्सिअसवर आले होते. तसेच हवेतील आर्द्रतेमुळे उकाडा निर्माण झाला होता. त्यातच आता ठाणे आणि नवी मुंबईमध्ये शुक्रवारी पडलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पण शनिवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यातच आता पुढील दोन-तीन दिवस राज्यात पावसाळी वातावरण राहणार असून, नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
Thunderstorm accompanied with lightning, Light to Moderate rain and gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of North Madhya Maharashtra.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया.
https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/PnsMEl1Dbk— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 12, 2025
येत्या शनिवारी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हवामान ढगाळ राहील. तसेच काही ठिकाणी तुरळक सरी कोसळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या रविवारपासून पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची तीव्रता कमी झाली होती. पण आता मुसळधार पाऊस कोसळणार आहे, असा इशारा हवामान विभागाने वर्तवला जात आहे.
कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस परतणार आहे. पुणे, अहमदनगर, कोल्हापूर घाट परिसर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, आणि जालना जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतीत पाणी नसलेल्या भागातील शेतकऱ्यांनाही फायदा होण्याची शक्यता आहे.