
महाराष्ट्रात सध्या पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई उपनगरांमध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरू असून, विदर्भात ढगफुटीसदृश पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यासोबतच काही ठिकाणी जीवितहानी झाल्याचेही पाहायला मिळत आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात काही तासांपासून सातत्याने पाऊस सुरु आहे. मुंबईतील कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर आणि गोरेगाव या उपनगरांमध्ये रात्रीपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. सध्या काळ्या ढगांनी आकाश भरून आले असून आजही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सतर्क राहावे, असा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. चार ते पाच तास कोसळलेल्या संततधारेमुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये घरांची पडझड झाल्याने संसार उघड्यावर आले आहेत. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातून वाहणाऱ्या उतावली नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे संभाजीनगर-नागपूर महामार्गावर पिंपरी सरहद गावाजवळ एक ट्रक पलटी झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने मध्यरात्री ही दुर्घटना घडली. या ट्रकची तपासणी केली असता त्यातील चालकाचा केबिनमध्ये अडकून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. याबद्दल पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढून पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.
अकोला जिल्ह्यात नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तर बुलढाणा जिल्ह्यात सर्पदंश झाल्यानंतर पुरामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यात मंगळवारी पहाटे चार तास बरसलेल्या दमदार पावसामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे नद्या-नाल्यांना पूर येऊन हजारो हेक्टरमधील उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. देऊळगाव कुंडपाळ, अजिसपूर, धाड, पांग्रा डोळे, टिटवी, लोणार, हिरडव, बोरखेडी, गुंधा या भागांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या परिसरात असलेला देऊळगाव कुंडपाळ लघु पाटबंधारे सिंचन प्रकल्प ढगफुटीसदृश पावसामुळे १०० टक्के भरून ओसंडून वाहत आहे. या पावसामुळे प्रकल्पाच्या भिंतीच्या मध्यभागी दगडी पिचिंगच्या वर एक मोठे भगदाड पडले आहे, ज्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे भगदाड वाढण्याची शक्यता असून, बांधाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर लघुपाटबंधारे विभागाने परिसरातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. देऊळगाव कुंडपाळ येथील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. स्थानिक ग्रामपंचायतीने यापूर्वी अनेक वेळा बांधावरील झाडे व झुडुपे काढण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती, मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्यामुळे भिंत झाडांमुळे ठिसूळ बनल्याचे समोर आले आहे. सध्या पाण्याचा दाब लक्षात घेता, बांध कधीही फुटू शकतो अशी भीती ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.
लोणार तालुक्यात अतिवृष्टीमुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, काही नद्यांच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने चार मार्गांवरील गावांचा संपर्क तुटला होता. यात हिरडव ते लोणार, लोणार ते देऊळगाव कुंडपाळ, अजिसपूर ते खुरमपूर, वडगाव ते वडगाव फाटा या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. टिटवी, देऊळगाव कुंडपाळ आणि गुंधा लघु पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले असून सांडव्याद्वारे विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या देऊळगाव कुंडपाळ, टिटवी, रायगाव, नांद्रा, गुंजखेड, मोहोतखेड या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला लोणार तालुक्यातील पाच आणि खामगाव, शेगाव तालुक्यातील दोन मंडळांत ढगफुटीसदृश पावसामुळे झालेल्या पिके, शेतजमिनी आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात काल जोरदार पाऊस झाला. ढालेगाव येथील बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडल्याने गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदाकाठच्या शेतीला फायदा होणार असून, महिनाभरापासून पाऊस नसल्याने सुकलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. काल झालेल्या दमदार पावसामुळे माजलगाव तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. एकंदरीत, महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला असून मुंबई उपनगरात संततधार तर विदर्भात ढगफुटीसदृश पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मोठ्या नुकसानीची नोंद करण्यात आली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.