कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट, तर रत्नागिरीत मुसळधार पावसाचा अंदाज; पाहा महाराष्ट्रात कुठे किती पाऊस?

Maharashtra Rain Update : कोल्हापूरला पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट, हातनुर धरणाचे 41 दरवाजे उघडले तर रत्नागिरीत मुसळधार; जाणून घ्या राज्यातील पावसाची स्थिती काय?

कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट, तर रत्नागिरीत मुसळधार पावसाचा अंदाज; पाहा महाराष्ट्रात कुठे किती पाऊस?
| Updated on: Jul 23, 2023 | 10:49 AM

मुंबई | 23 जुलै 2023 : राज्यात सगळीकडे जोरदार पाऊस बसतोय. ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. काही ठिकाणी तर पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर महाराष्ट्रात पुढचेही काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याला आजपासून पुढचे तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर भुसावळमध्ये मागचे काही दिवस पावसाचं धुमशान पाहायला मिळतंय. त्यामुळे हातनुर धरणाचे सलग दुसऱ्या दिवशीही 41 दरवाजे पूर्णपणे उघडे आहेत.

कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट!

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरूच आहे. त्यामुळे गगनबावडा मार्गे कोल्हापुराचा कोकणाशी थेट संपर्क तुटला आहे. मांडूकली, गवशी पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पातळी 37 फुटांवर पोहोचली आहे.संपूर्ण जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्याला आज पासून पुढचे तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हातनुर धरणाचे सलग दुसऱ्या दिवशीही 41 दरवाजे पूर्णपणे उघडे आहेत. 1 लाख 45 हजार 215 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात केला जातोय. त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मध्यप्रदेश आणि विदर्भात होत असलेल्या पावसामुळे हातनूरच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत.

रत्नागिरीत जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी पाहयला मिळतेय. कोकणात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकणाला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पर्यटन स्थळांवर नजर ठेवण्यात येतेय. खेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर वाहाते आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चंद्रपूरात वर्धा नदीनेही इशारा पातळी ओलांडली आहे. यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि निम्न वर्धा आणि बेंबाळ धरणातून पाणी सोडल्याने पैनगंगा आणि वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. वर्धा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने राजुरा-बल्लारपूर, लाठी-विरुर, हडस्ती-चारवट आणि भोयगाव-धानोरा मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत.

पैनगंगा नदीचं पाणी वाढल्याने कोरपना तालुक्यातील अंतरगावात नाल्याचं पाणी शिरलं आहे. तर वनसडी-अंतरगाव आणि कोडशी-पिपरी मार्ग बंद करण्यात आले आहेत. पैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने परसोडा, रायपुर, अकोला, पारडी, कोडशी, जेवरा, पिपरी, वनोजा, सांगोडा, भोयगाव आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

यवतमाळ जिल्ह्यातील महागावमध्ये काल अडकलेल्या 110 जणांना राज्य आपत्ती व्यवस्थापन च्या पथकाने मोठ्या जिगरीने बाहेर काढून वाचवलं आहे. या ठिकाणी असलेले लोक हे पुरात 24 तासपासून अडकून होते. मोठा वेढा गावाला पाण्याचा होता बोट चालवणं सुद्धा मुश्कील झालं होतं. मात्र अश्या परिस्थिती आम्ही नदीच्या पात्र पार करून या गावातील लोकांना वाचवण्यात आलं.