
सध्या दिवसभ ऑक्टोबर हीट जाणवत असून उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र आता याच उकाड्यादरम्यान पुण्यासह राज्यातील अनेक अनेक भागातील नागरिकांना दिलासा मिळू शकतो. तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण भारतात 25 ते 28 ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या भागात रेड आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्याचा परिणाम परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होणार आहे.
पुण्यात यलो अलर्ट
दिवसभर उकाडा वाढणार असला तरीही दुपारनंतर महाराष्ट्रातील तळ कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही पट्ट्यांमध्ये पाऊस पडू शकतो. तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान पुण्यात पुढील दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. ऑक्टोबर हिटमुळे वाढलेल्या उघड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शहर आणि परिसरात गुरुवार आणि शुक्रवार पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे तापमानात मोठी घट झाली. तर आता पुढचे दोन दिवस मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
तसेच मुंबईतही पुढचे दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागांत गडगडाटसह वादळी पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
सोलापूर शहर आणि जिल्ह्याला यलो अलर्ट जाहीर
सोलापूर शहर आणि जिल्ह्याला यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. काल संध्याकाळपासूनच मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागात पाणी साचल्याच पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळे नागरी वस्तीतही काही प्रमाणात पाणी साचले होते. महापालिका प्रशासनाकडून मध्यरात्री पाणी साचणाऱ्या भागात कर्मचारी तैनात करण्यात आले होते. – सोलापूर शहरातील पूर्व भाग, अवंती नगर, वसंत विहार, जुळे सोलापूर, नई जिंदगी या भागात मोठ्या प्रमाणात पाणी पाऊस झाला. मात्र मध्यरात्री पावसाने उसंत दिल्याने सोलापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पण पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तसेच द्राक्ष बागायतदार, डाळिंब बागायतदार यांच्या चिंतेतही वाढ झाली आहे.
गडचिरोलीत परतीच्या पावसामुळे भात पिकाचे मोठे नुकसान
गडचिरोली जिल्ह्यात काल रात्री परतीच्या पावसामुळे भात पिकाचं मोठं नुकसान झालं. काल रात्री एकपासून पहाटे चार वाजेपर्यंत जवळपास तीन ते असे परतीच्या पावसाने झोडपून काढलं. पावसामुळे सध्या कापणी वर असलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने कापूस आणि भाताची शेतीचे नुकसान केले.