SSC Result 2026 : सोलापुरातील दोघांना सर्व विषयात 35 मार्क, तर दोन जुळ्या बहिणींना सेम टू सेम मार्क; हृदयाचा आजार असूनही…

या वर्षीच्या दहावीच्या निकालात अनेक लक्षवेधी गोष्टी समोर आल्या आहेत. सोलापूरमधील दोन विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयात हुबेहूब 35 गुण मिळवून सर्वांचे लक्ष वेधले आहे. यात एका विद्यार्थिनीने गंभीर आजारावर मात करत यश मिळवले. तर नागपुरातील जुळ्या भावंडांना 97.2% समान गुण मिळाल्याने तेही चर्चेचा विषय ठरले आहेत. हा निकाल विद्यार्थी आणि पालकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

SSC Result 2026 : सोलापुरातील दोघांना सर्व विषयात 35 मार्क, तर दोन जुळ्या बहिणींना सेम टू सेम मार्क; हृदयाचा आजार असूनही...
दहावी परीक्षेचा निकाल नुकताच लागला
| Updated on: May 09, 2026 | 1:43 PM

इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल लागल्याने मुलांमध्ये प्रचंड जल्लोष आहे. इयत्ता दहावीचं कठिण वर्ष सुटल्याने अनेकांच्या आनंदाला उधाण आलं आहे. काही टक्केवारी चांगली मिळालीय. तर काहींना कमी टक्के मिळाले आहेत. पण सुटलो बुवा एकदाचे असं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. यंदा दहावीच्या परीक्षेतील दोन गोष्टी लक्ष्यवेधी ठरल्या आहेत. सोलापुरातील दोन विद्यार्थ्यांना 35 टक्के मार्क मिळाले आहेत. म्हणजे सर्व विषयात 35-35 मार्क मिळाले आहेत. तर नागपुरातील जुळ्या बहिणींना सेम टू सेम मार्क मिळाले असल्याने त्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

सोलापुरातील निकिता कुचेकर या दहावीच्या विद्यार्थिनीला सर्व विषयात 35 मार्क मिळाले आहेत.दुर्धर आजारावर मात करत निकीतने सर्व विषयात 35 मार्क मिळवल्याने चर्चेचा विषय ठरली आहे. शहरातील ज. रा. चंडक प्रशालेची निकिता विद्यार्थीनी आहे. मी आजारी होते. त्यामुळे शाळेत जायला नको म्हणत होते. मात्र शिक्षकांनी आग्रह केल्याने मी परीक्षेला बसले. आजारी असूनही मी परीक्षा दिली आणि पास झाले, असं निकिता म्हणतेय.

वर्षातून तीन महिने झोपून

तर, माझ्या मुलीला हृदयाचा आजार आहे. ती वर्षातून दोन ते तीन महिने झोपून असते. मी बांधकाम कामगार आहे. मात्र मुलीने शिकावे, अशी माझी इच्छा आहे. तिने सर्व विषयात 35 मार्क मिळवलेत. त्यामुळे आनंद झालाय. मार्क कमी मिळाले असले तरी आम्ही तिला शिकवणार आहोत, असं तिच्या आईवडिलांनी म्हटलं आहे.

हा नशिबाचा भाग

सोलापूर जिल्ह्यातीलच करमाळा तालुक्यातील कामोने येथील विद्यार्थी अक्षय बाळासाहेब भालेराव याने दहावीच्या परीक्षेत एक अनोखा विक्रम घडवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दहावीच्या परीक्षेत अक्षयला प्रत्येक विषयात नेमके 35 गुण मिळाल्याने सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अक्षयला मराठी – 35, हिंदी – 35, इंग्रजी – 35, गणित – 35, विज्ञान – 35 आणि सामाजिक शास्त्र – 35 आदी सर्व सहा विषयांत समान गुण मिळाले आहेत. त्यामुळे त्याचे एकूण 500 पैकी 175 गुण झाले असून तो उत्तीर्ण झाला आहे.

दहावीच्या निकालात अनेक विद्यार्थी उच्च गुण मिळवून चर्चेत येतात. मात्र अक्षयने सर्वच विषयात समान 35 गुण मिळवून वेगळीच ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक विषयात एकसारखे गुण मिळणे ही बाब विशेष मानली जाते. अक्षयच्या या अनोख्या निकालाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली असून मित्रपरिवार, शिक्षक व ग्रामस्थांकडून त्याचे अभिनंदन केले जात आहे. पास होण्यासाठी लागणारे गुण प्रत्येक विषयात अचूक मिळवणे हा नशिबाचा भाग नसून ते बुध्दी कौशल्य मानले जाते, असे म्हणत अनेकांनी अक्षयचे कौतुक केले.

जुळे आणि सारखे गुण

दरम्यान, दहावी परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले मात्र नागपुरातील जुळ्या भावा बहिणीने अगदी सारखे मार्क मिळविले आहेत. खिलाज आणि खुशी चांदेवर असे या जुळ्या भावा बहिणींचे नाव आहे. या दोन्ही जुळ्या भावा बहिणीला 97.2 टक्के मार्क मिळाले आहेत. दोघेही सोमलवार शाळेत शिकत होते. दोघंही सोबत अभ्यास करायचे. मात्र दोघंही वेगवेगळ्या नोट्स काढायचे. लहानपणापासून दोघंही सोबत राहिले. सोबत अभ्यास केला आणि दोघांनी सारखे गुण मिळविले. पुढे सुद्धा दोघांना सोबत अभ्यास करून गुण मिळवायचे आहेत.

Follow Us