Amit Parab : सहअभिनेत्रीचे गंभीर आरोप, चारित्र्यावर आल्यानं…अभिनेत्यानं सांगितलं ‘स्टार प्रवाह’ची मालिका सोडण्याचं कारण
Star Pravah Actor : मराठी अभिनेता अमित परबनं नुकत्याच एका मुलाखतीत स्टार प्रवाहची मालिका सोडण्याचं कारण सांगितलं आहे.

मराठी अभिनेता अमित परबने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्यानं ‘हळद रुसली कुंकू हसलं‘ या मालिकेत जयकांत रांगणेची भूमिका साकारलेली. मात्र, या अभिनेत्यानं ही मालिका अचानक सोडली. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्यानं ही मालिका सोडण्याचं कारण सांगितलं आहे. अमित म्हणाला की, ‘प्रोजेक्टला गालबोट लागू नये, यासाठी इतके दिवस त्यावर बोलणं मी टाळलं होतं, कारण वर्षभर एखादी सिरीअल केल्यावर ते प्रोजेक्ट आपल्या बाळासारखं असतं. एका सहअभिनेत्रीकडून चुकीच्या गोष्टी बोलल्या गेल्या, मला ते पटलं नाही, म्हणून मी ऑन द स्पॉट राजीनामा दिला होता.’
‘मी कोकणी माणूस आहे, आपल्या निष्ठेवर किंवा चारित्र्यावर एखादी गोष्ट येते, तेव्हा तिथं थांबणं मला चुकीचं वाटतं. मी ऑन द स्पॉट निर्णय घेतला होता. आमचे निर्माते, प्रॉडक्शन हाऊस, चॅनेल यांना मेल टाकला होता की, काही गोष्टी घडल्या ज्या मला कम्फर्टेबल नाहीत. मी खूप मनापासून काम करणारा अभिनेता आहे, मी वेळेवर येतो आणि वेळेवर जातो, बाकी लोकांशी मला काही देणंघेणं नसतं. पण असं काही चुकीचं बोललं गेलं, तर त्याचा भाग बनणं मला चुकीचं वाटतं.’
‘आमच्या निर्मात्या – सोबो फिल्म्सच्या स्मृती शिंदे खूप दयाळू आहेत. त्या ऑन द वे अंधेरीहून ठाण्याला आमच्या सेटवर आल्या. त्यांच्यासोबत त्यांची सुरक्षा, व्हॅनिटी असा अख्खा ताफा असतो, कदाचित एकवेळ त्यांच्या येण्याचा खर्चही १५-२० हजार रुपये असेल. पण त्या आल्या. मी एक नवखा अभिनेता असूनही त्या आल्या, त्यांना काही गरज नव्हती, एका फोनवरही काम होऊ शकलं असतं. आमच्यात काही डिस्कशन झालं. त्यांना मी सांगितलं की, जे घडलं ते मला पटलं नाही. विशेष म्हणजे सेटवरचे सगळे अभिनेते माझ्या बाजूने उभे होते.’
‘ज्यांच्यासोबत इश्यू झाला होता, त्यांना सेटवरील प्रत्येकासोबत काही ना काही प्रॉब्लेम होता. प्रत्येकाच्या कॅरेक्टरवर, काही ना काही गोष्टीवर त्या आक्षेप घेत होत्या. मेकअपमन पासून अभिनेत्यांपर्यंत. आस्ताद काळे दादा एकदा बोलल्याचं मला आठवतं, की, सेटवर प्रत्येक पुरुष फक्त तुमच्याकडे चुकीच्या पद्धतीने बघायला येत नाही, तो काम करायला येतो, तुम्ही प्रत्येक पुरुषावर कशे ताशेरे ओढू शकता.’ असंही अमित म्हणाला. ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन‘ला दिलेल्या मुलाखतीत अमित बोलत होता.
