हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला; अवकाळीचा राज्याला मोठा तडाखा; कोणत्या जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान?

महाराष्ट्रात जालना, जळगाव, नांदेड, बीड, पुणे आणि सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला असून द्राक्ष, गहू व कांदा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे; वीज पडून पशुहानीची नोंद झाली आहे.

हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला; अवकाळीचा राज्याला मोठा तडाखा; कोणत्या जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान?
rain
| Updated on: Mar 31, 2026 | 10:21 AM

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध जिल्ह्यांत झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जालना, जळगाव, परभणी, धुळे, पुणे, नांदेड, बीड, सोलापूर आणि बुलढाणा या जिल्ह्यांत पावसाने अक्षरशः तांडव केले. यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाने तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली जात आहे.

जालन्यात द्राक्ष बागांना मोठा फटका

जालना जिल्ह्यात काल सायंकाळी आणि मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे फळबाग उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. बदनापूर तालुक्यातील सोमठाणा परिसरात द्राक्ष उत्पादक शेतकरी गणेश पवार यांच्या ३ एकर क्षेत्रावरील बागेचे प्रचंड नुकसान झाले. काढणीला आलेले द्राक्षाचे घड वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर कोसळले आहेत. तर भोकरदनमध्ये अवकाळी पावसामुळे सुरू असलेल्या एका लग्नाचा मंडप उडाला. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे वऱ्हाडी मंडळींची पळापळ झाली. परिणामी शुभकार्य अर्ध्यावरच उरकून घेण्याची वेळ आली.

जळगाव आणि धुळ्यात गहू आणि कांदा पिके जमीनदोस्त

जळगावच्या नशिराबाद परिसरात गव्हाचे पीक काढणीला आले होते. आज मशीनद्वारे कापणी होणार होती, मात्र त्यापूर्वीच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ३ एकरावरील उभा गहू पूर्णपणे भिजून गेला आहे. त्यामुळे गव्हाचे पीक जमिनीला टेकल्याने आता ते मातीमोल झाले आहे. त्यातच गेल्या वर्षीच्या नुकसानीची मदत अद्याप मिळाली नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे धुळ्यातील साक्री आणि धुळे ग्रामीण भागात गारपिटीसह पाऊस झाला. यामुळे गहू, कांदा, बाजरी आणि मका या पिकांचे नुकसान झाले आहे.

पुण्यातील चाकणमध्ये बाजार समितीच्या निष्काळजीपणामुळे नुकसान

पुणे जिल्ह्यातील चाकण बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला हजारो क्विंटल कांदा अचानक आलेल्या पावसामुळे भिजला. बाजार समितीकडे पावसापासून संरक्षणासाठी शेड किंवा ताडपत्रीची योग्य व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांचा माल खराब झाला. आधीच पडलेले भाव आणि त्यात ही हानी यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

मराठवाड्यात पशुहानी आणि पिकांचे नुकसान

नांदेड जिल्ह्यात रात्री झालेल्या पावसामुळे ज्वारी, मका, केळी, आंबा, हळद आणि भाजीपाला पिके भुईसपाट झाली आहेत. अर्धापूर, मुदखेड आणि भोकर तालुक्यात सर्वाधिक फटका बसला असून, अर्धापूरमध्ये वीज पडल्याने गोधन (गाय/बैल) दगावले आहे. तसेच बीडच्या गेवराई तालुक्यातील उमापूर येथे ज्ञानेश्वर लाळगे यांच्या दोन बैलांचा, तर बीड तालुक्यातील बोरफडी येथे अर्जुन घुगे यांच्या एका बैलाचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तर परभणीत ज्वारी, हळद, आंबा आणि चिकू बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

बुलढाणा आणि सोलापुरात निसर्गाचा दुहेरी फटका

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ६ हजार हेक्टरवर नुकसान झाले होते. आता पुन्हा झालेल्या वादळी पावसामुळे गहू, हरभरा आणि कांदा पिके आडवी झाली आहेत. तसेच सोलापूरच्या दक्षिण सोलापूरच्या विंचूर परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. विंचूर शिवारात एका नारळाच्या झाडावर वीज कोसळली, तर मंद्रूप परिसरात डीपीला आग लागल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.

दरम्यान राज्यातील अवकाळी पावसामुळे राज्यात सर्वत्रच दाणादाण उडवून दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या सर्वच नुकसानग्रस्त भागांतील शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे. आम्ही रात्रंदिवस कष्ट करून पीक उभे केले, पण निसर्गाने सर्व हिरावून नेले. आता सरकारनेच आम्हाला आधार द्यावा, अशी आर्त हाक बळीराजा देत आहे.

Follow Us