अल निनोचं असंही संकट… पुढचे चार दिवस… घराबाहेर पडताना विचार करा; IMD कडून अलर्ट जारी

IMD Maharashtra Weather : हवामान विभागाकडून मान्सूनवर अल निनोचा प्रभाव असल्याची माहिती देण्यात आली आहे. आता विदर्भात पावसाऐवजी उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अल निनोचं असंही संकट... पुढचे चार दिवस... घराबाहेर पडताना विचार करा; IMD कडून अलर्ट जारी
IMD Heatwave Alert in Vidarbha
Image Credit source: Google
| Updated on: Jun 12, 2026 | 5:11 PM

राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप समाधानकारक पावसाला सुरूवात झालेली नाही. अशातच आता हवामान विभागाकडून मान्सूनवर अल निनोचा प्रभाव असल्याची माहिती देण्यात आली आहे. नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी मान्सूनच्या पावसाबाबत माहिती देताना राज्याच्या काही भागात उष्णतेचा कहर पहायला मिळणार असल्याचा इशारा दिला आहे. नागपूर हवामान विभागाने नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

अल निनोमुळे पावसाची शक्यता कमी

नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ प्रवीण कुमार यांनी सांगितले की, आता अल निनो सक्रिय झालेला आहे मात्र तो कमजोर आहे, जसजसा मानसूनचा पाऊस यायला सुरुवात होईल त्यानुसार तो सुद्धा ऍक्टिव्ह होत जाईल. पावसाच्या महिन्यांमध्ये म्हणजेच सप्टेंबरच्या आसपास जेव्हा जास्त पाऊस असतो, त्यावेळी मोठ्या प्रमाणात अल निनो सक्रिय होईल आणि त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होईल. मान्सूनच्या शेवटपर्यंत अल निनोचा प्रभाव कायम असेल.

पुढे बोलताना कुमार यांनी सांगितले की, इंडियन ओशियन डायफॉल हा सुद्धा फर्स्ट फेजमध्ये आहे. इंडियन ओशन डायफॉल आणि अलनिनो हे दोन्ही असल्यामुळे भारतासोबतच विदर्भात सुद्धा पावसाची संभावना कमी होत आहे. यामुळे संपूर्ण मानसूनमध्ये पाऊस जो आहे तो 94% पर्यंत येण्याचा अंदाज आहे. मध्यंतरीच्या काळात काहीसा चांगला पाऊस पडू शकतो, मात्र एमजे आणि अलनिनो यामुळे मान्सून जास्त सक्रिय होत नाही.

अल निनोची प्रक्रिया ही साऊथ अमेरिकेच्या समुद्रामध्ये होत असते, तिथलं समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य पेक्षा जास्त होते, त्यामुळे अल निनो तयार होतो आणि याचा पावसावर परिणाम होतो. दोन ते सात वर्षांमध्ये अल निनो त्याचा प्रभाव दाखवत असतो. आतापर्यंतचा डाटा बघितला तर जेव्हा जेव्हा अल निनो आला तेव्हा तेव्हा पावसाचे प्रमाण कमी असल्याचे पाहायला मिळालं.

या जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट

विदर्भातील मान्सूनबाबत बोलताना प्रवीण कुमार यांनी सांगितले की, विदर्भात मान्सून दाखल व्हायला अजून वेळ आहे, कारण परिस्थिती अजून बनलेली नाही. आगामी काळात चार ते पाच दिवस अनुकूल परिस्थिती तयार होण्याचीही शक्यता नाही. सध्या तीन ते चार दिवस तापमानामध्ये वाढ होणार आहे. गरम हवा मोठ्या प्रमाणात वाहत आहे त्यामुळे सामान्य पेक्षा जास्त तापमान तयार होत आहे. त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये अमरावती, वर्धा, अकोला, नागपूर या जिल्ह्यांमध्ये हीटवेव्हचा इशारा देण्यात आला आहे. या काळात चार ते पाच अंश सेल्सिअसने तापमान जास्त राहणार आहे.

Follow Us